घरफोडी करून चाेरी करणाऱ्यास शिक्षा
By अनिल गवई | Published: March 25, 2023 05:28 PM2023-03-25T17:28:34+5:302023-03-25T17:29:16+5:30
एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा
खामगाव - स्थानिक शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपाळ नगरात घरफोडी करून चाेरी करणाऱ्या एका आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा महत्वपूर्ण निकाल खामगाव येथील प्रथम वर्ग कोर्ट क्रमांक ३ चे न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. राजुरकर यांनी शुक्रवारी सायंकाळी दिला.
या संदर्भात घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी रामेश्वर ज्ञानदेव लाहुडकर यांनी १७ मार्च २०१७ राेजी शिवाजी नगर पो.स्टे.ला फिर्याद दिली होती की ते किराणा दुकान चालवून त्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे किराणा दुकान हे घरालगत आहे. त्यांनी १६ मार्च १७ रोजी नेहमीप्रमाणे रात्री १०.०० चे सुमारास दुकान बंद केले व दिवस भरात झालेल्या विक्रीचे व उधारीचे लोकांनी दिलेले रू.२५ हजार रूपये गल्ल्यामध्ये ठेवून कुलूप लावून झोपण्यासाठी गेले. तर १७ मार्चच्या रात्री अंदाजे २.३० वा. सुमारास आवाज आल्याने उठून घराबाहेर आले. दरम्यान, लाईट सुरू केले असता गल्लीत राहणारा संदीप नारायण भवरे हा माझे किचन रूममधून पळून जाताना दिसला व मी बंद करून ठेवलेला किचनचा दरवाजा उघडा दिसला. मी निट बघितले असता माझ्या दुकानात जाणाऱ्या दरवाजाचे चाैकटीवर ठेवलेल्या कपाटावरून किराणा दुकानामध्ये त्याने प्रवेश करून गल्ल्यातील ठेवलेले रू.२५ हजार चोरून नेले असल्याचे लक्षात आले. त्याने माझे रू.२५ हजार चोरी केले आहे, अशी फिर्याद दिली.
तपास अधिकारी पोउपनि आनंद मारोती बिचेवार यांनी आरोपीची पोलीस कोठडी घेऊन चोरी झालेल्या रकमेपैकी २० हजार रूपये आरोपीकडून जप्त केले. तपासाअंती आरोपीविरूध्द भक्कम पुरावा मिळून आल्याने दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
अभियोग पक्षातर्फे एकुण ४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यांनी दिलेली साक्ष व वि.सहाय्यक सरकारी अभियोक्ता अजय ज.इंगळे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय ठरवून आरोपीस भादंविचे कलम ४५७ नुसार दोषी ठरवून १ वर्ष सश्रम कारावास व २००० रूपये दंड तसेच कलम ३८० नुसार दोषी ठरवून १ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा शुक्रवारी सायंकाळी सुनावली.