शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा
By अनिल गवई | Published: June 15, 2023 06:18 PM2023-06-15T18:18:49+5:302023-06-15T18:18:58+5:30
मुख्य साक्षीदार फितूर झाल्याने वरिष्ठांना कारवाईचे न्यायालयाचे आदेश
खामगाव: शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा सिध्द झाल्याने खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आरोपीस कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. त्याचवेळी महत्वाच्या मुद्यावर मुख्य साक्षीदार फितूर झाल्याने न्यायालयाने संबंधित साक्षीदाराच्या वरिष्ठांना कारवाईचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले. खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एस. कुळकर्णी यांनी हा महत्वपूर्ण निकाल गुरूवारी दिला.
याबाबत प्राप्त माहितीनुसार असे की, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनतंर्गत येत असलेल्या ज्ञानगंगापूर येथे पंचनामा केलेली फाईल हिसकावत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ग्रामसेवक राजनंदन गवई यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये गोविंदा शेषराव पैठणकर ३५ याच्या िवरोधात ५ डिसेंबर २०१७ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार पिंपळगाव राजा पोलीसांनी भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, १८९ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला.
तपासाअंती दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. दोषारोप पत्र सिध्द करताना न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. यात मुख्य साक्षीदार फितूर झाल्याने भादंवि कलम ३३२, ५०४, १८९ आरोपीची निर्देाष मुक्तता जिल्हा सत्र न्यायाधीश पी.एस.कुळकर्णी यांनी संबंधितांवर कारवाईसाठी त्याच्या वरिष्ठांना आदेश दिले. तर भादंिव कलम ३५३ मध्ये गुन्हा सिध्द झाल्याने आरोपी गोविंदा पैठणकर यास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व दोन हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील क्षितीज अनोकार यांनी मांडली. कौर्ट पैरवी हेकॉ राजू परदेशी यांनी केली.