चौघांकडून पाठलाग, वॉचमन खाली पडला; पंपावरून लोखंड लांबवले
By अनिल गवई | Published: April 5, 2024 06:09 PM2024-04-05T18:09:07+5:302024-04-05T18:09:27+5:30
प्रिंपाळा शिवारातील घटना : ८५ हजारांचे साहित्य चोरून नेले
खामगाव : वॉचमनला दमदाटी करून अज्ञात तीन ते चार जणांनी लोखंडी साहित्य पळविले. ही घटना मध्यरात्री प्रिंपाळा शिवारात घडली. याप्रकरणी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, प्रिंपाळा शिवारात भोजवानी यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर लोखंडी सेंट्रिंगचे साहित्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ५ एप्रिलच्या मध्यरात्री वॉचमन गजानन रामधन पेसोडे झोपण्यासाठी जात असताना पंपाच्या दिशेने काही जण येताना दिसले. त्यामुळे घाबरल्याने पेसोडे माघारी फिरत असतानाच, धारधार शस्त्रधारी तीन ते चार जणांनी त्यांचा पाठलाग केला. धावपळीत ते खाली पडून जखमी झाले.
त्यानंतर संबंधितांनी पेसोडे यांना जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोल पंपावरील बांधकाम साहित्य, लोखंडी प्लेट असे एकूण ८५ हजारांचे साहित्य पळविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी चार अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३८२, ३७९, ३४ नुसार गुन्हे दाखल केले. पुढील तपास एएसआय गजानन जोशी करीत आहेत.