समृद्धी महामार्गावरील वळणमार्गांचा प्रश्न ऐरणीवर - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:35 AM2021-05-19T04:35:46+5:302021-05-19T04:35:46+5:30
सध्या कोरोना संसर्ग काळात मोजक्या स्वरूपात वाहतूक होत असल्याने परिस्थिती गंभीर नाही. मात्र, येत्या काही दिवसांतच पावसाळ्याच्या तोंडावर, खते, ...
सध्या कोरोना संसर्ग काळात मोजक्या स्वरूपात वाहतूक होत असल्याने परिस्थिती गंभीर नाही. मात्र, येत्या काही दिवसांतच पावसाळ्याच्या तोंडावर, खते, बी बियाणे, आदींसाठी मार्ग शेतीसाठी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता होत आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे काम कोरोना संसर्गाच्या काळातही मोठ्या गतीने सुरू आहे. यंत्रसामग्रीसह शेकडो वाहने व माणसे त्यासाठी रात्रंदिवस राबत आहेत. समृद्धी मार्गामुळे राज्याच्या उपराजधानी व राजधानी दरम्यानची इतरही अनेक शहरे वाहतुकीने एकमेकांना जोडली जाणार आहेत.
याचवेळी महामार्ग कामामध्ये अडथळा ठरत असल्यामुळे तालुक्यातील अंतर्गत अनेक मार्ग खंडित झालेले आहेत. त्यामध्ये बीबी ते कुंबेफळ, देऊळगाव कोळ, कंडारी, भंडारी, महारचिकनाकडे जाणारा तसेच सावखेड तेजन ते जळगाव, पिंपळगाव, सिंदखेडराजा, सावरगाव माळ येथून तुळजापूरकडे जाणाऱ्या अशा अनेक छोटछोट्या अंतर्गत मार्गांचा समावेश आहे. त्या मार्गांना समृद्धी महामार्गासाठी तोडून, उंचसखल असे थातुरमातुर वळणमार्ग काढलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचंड धुळीने माखलेल्या ह्या मार्गांवर तुरळक वाहतूक होत आहे. या मार्गांना पर्यायी मार्ग उपलब्ध असले, तरी पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांना ह्याच मार्गांचा वापर केल्याशिवाय शेतात जाता येणार नाही. त्यामुळे या वळणमार्गांचे तातडीने व्यवस्थित बांधकाम करणे गरजेचे ठरत आहे.
वळणमार्ग पक्के करण्याची मागणी
समृद्धी मार्गामुळे खंडित झालेल्या व धुळीने माखलेले थातुरमातुर वळणमार्ग पक्क्या स्वरूपात तयार करून देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख शिवा ठाकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी राजे जाधव यांनी केली आहे.
आंदोलनाची शक्यता
रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी दूरच्या अंतराचा पर्याय शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा नसल्याने ऐनवेळी एखादे आंदोलन होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. एक महिन्यापूर्वी म्हणजेच एप्रिलच्या मध्यंतरी तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. त्यातून या अंतर्गत मार्गावरील सर्वच वळणमार्ग चिखलमय झाले होते. तेव्हा सपाट नसलेल्या उंच-सखल अशा वळणमार्गांवर अचानक घसरगुंड्या निर्माण होतात. अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे दोन-तीन दिवस चांगलेच हाल झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सभापती मीना बंगाळे यांनी सांगितले.