सूतगिरणी सुरू होण्याचा प्रश्न अनुत्तरीतच
By Admin | Published: December 31, 2014 12:21 AM2014-12-31T00:21:05+5:302014-12-31T00:21:05+5:30
मलकापूर तालुक्यातील वीर जगदेवराव सूतगिरणी ; ४00 कामगारांवर उपासमारीची पाळी.
हनुमान जगताप /मलकापूर
तालुक्यातील एकमेव असलेली वीर जगदेवराव कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी तीन आठवड्यांपासून बंद पडली आहे. शेतकर्यांसाठी स्थापित या गिरणीत शेतकर्यांना न्यायाच्या अपेक्षा आधीच मावळल्या आहेत. असे असले तरी या गिरणीवर उपजीविका भागविणार्या सुमारे ४00 चे वर पुरुष, महिला कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न मात्र अनुत्तरीत असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यातील शेतकर्यांच्या कापसाला समाधानकारक भाव मिळावा, रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे या धर्तीवर वीर जगदेवराव कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीची निर्मिती झाली. कापसाची खरेदी, त्यातून सूत व गाठी अशी दज्रेदार वाटचाल एकेकाळी गिरणीची होती; मात्र मागील काही वर्षे गिरणीची अवस्था ढिसाळ झाल्याने शेतकर्यांच्या अपेक्षा मावळल्या आहेत. भाडेतत्त्वावर खासगी व्यापार्याला सूतगिरणी देण्यात आल्याने सर्व कारभार व्यापारी बघतात अर्थात त्यावर संचालक मंडळाची देखरेख आहे. हे देखील तितकेच खरे, आणि अजून सुमारे ५00 च्यावर पुरुष, महिला कामगारांची उपजीविका सूतगिरणीवर आहे.
प्राप्त माहितीनुसार या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वीर जगदेवराव कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी बंद पडली आहे. याविषयी माहिती घेतली असता वीज वितरण कंपनीचे थकीत बिल, कामगारांच्या पीएफची रक्कम, इतर खर्च, त्याचबरोबर कच्च्या मालाची समस्या यातून लाखोच्या घरात नुकसान सहन करावे लागल्याच्या धर्तीवर सदर गिरणीचे ह्यओनरह्ण व्यापार्याने गिरणी बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.