बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या प्रवास भत्त्याचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 02:30 PM2018-04-13T14:30:23+5:302018-04-13T14:30:23+5:30
मोताळा : सदर प्रश्न निकाली लागला असून, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी पोलीस पाटलांचे प्रवास भत्ता बिल पाठविण्याचे निर्देश बोराखेडीचे ठाणेदार भामरे यांना दिले.
मोताळा : सन २०१२ पासून बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा देय असणारा प्रवास भत्याचा प्रश्न प्रलंबित होता. पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी जिल्हास्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे सदर प्रश्न निकाली लागला असून, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी पोलीस पाटलांचे प्रवास भत्ता बिल पाठविण्याचे निर्देश बोराखेडीचे ठाणेदार भामरे यांना दिले. पोलिस स्टेशन बोराखेडी येथे नुकतीच शांतता कमिटीची बैठक अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. दरम्यान, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी त्यांच्याशी पोलीस पाटलांच्या प्रलंबित प्रवास भत्याबाबत चर्चा केली. अप्पर पोलीस अधीक्षक डोईफोडे यांनी ठाणेदार अविनाश भामरे यांना पोलीस पाटलांचे प्रवासभत्ता बिल पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवावे असे निर्देश दिले. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बोराखेडी या पोलिस स्टेशनपासून बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे प्रवास भत्याचा शुभारंभ होणार आहे. जिल्ह्यातील इतर सर्व पोलीस स्टेशनमधील पोलीस पाटलांचे प्रवास भत्त्यांचे नियतन टप्प्या टप्प्याने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी, ठाणेदार अविनाश भामरे, धामणगाव बढेचे ठाणेदार दीपक वळवी, तहसीलदार देशमुख यांची उपस्थिती होती. दरम्यान, पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डोईफोडे यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे मोताळा तालुका अध्यक्ष सुधाकर तायडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र भामद्रे तथा तालुक्यातील पोलिस पाटील उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)