सात गावांचा पाणी प्रश्न मिटला!
By admin | Published: October 3, 2016 02:49 AM2016-10-03T02:49:35+5:302016-10-03T02:49:35+5:30
मोताळा तालुक्यातील पलढग प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून सिंचन तथा पेयजलाचा प्रश्न मिटला आहे.
मोताळा(जि. बुलडाणा), दि. २- पावसाळय़ाचे चार महिने संपून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असतानाच तालुक्यातील प्रकल्पांमध्ये जल साठवण होईल की नाही, अशी शंका असताना पावसाने संपूर्ण तालुक्यात हजेरी लावल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पलढग प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. शनिवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेपासून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागायला सुरुवात झाली आहे. वरचेवर येणारा पाण्याचा ओघ पाहता धरणाच्या कॅनॉलचे गेट दोन इंच उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग नळगंगा धरणात सोडण्यात येत आहे.
जून ते ऑगस्टदरम्यान तालुकाभरात कमी-अधिक प्रमाणात पावसाने चांगली हजेरी लावली होती; मात्र तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने दरवर्षी ऑगस्ट महिन्यात तुडुंब भरणारा पलढग लघू प्रकल्प यावर्षी भरेल की नाही, अशी शंका होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने पलढग प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. दरवर्षी जुलै ते ऑगस्टच्या प्रारंभी हा तलाव भरून वाहत असतो; मात्र मागील चार महिन्यांपासून तालुक्यात पावसाचा ल पंडाव सुरू आहे. त्यामुळे नळगंगासह पलढग प्रकल्पात पाणी साठय़ाचे प्रमाण वाढत नव्हते; मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तलाव परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे पलढग प्रकल्पाचा पाणीसाठा शनिवारी सकाळपर्यंत ४00.१0 मीटरपर्यंत पोहोचला होता. शनिवारी दुपारपर्यंत पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे पाणीसाठा ४0३.१0 मीटरपर्यंत गेला व तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले. या प्रकल्पाची क्षमता ४0३.२0 मीटरची असून, संध्याकाळपर्यंत येणार्या काळात पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे नदीकाठावर राहत असलेल्या नागरिकांना पाटबंधारे विभागाच्यावतीने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
*नळगंगा धरणात २९ टक्के जलसाठा
मागील आठवडाभरापासून तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नळगंगा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरण २९ टक्के भरले आहे. आठवडापूर्वी धरणात २४ टक्के पाणी होते. नळगंगा धरणाची पूर्ण क्षमता ६६ फु टांची आहे. सध्या धरणामध्ये २0 दलघमी पाणी साठा आहे. तालुकाभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सं ततधार पावसामुळे पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यात ६४९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. असे असले तरी पावसाने सरासरी ओलांडली नाही.