ग्रामीण भागात लसीकरणासाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:37+5:302021-05-04T04:15:37+5:30
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २३ खेडी येतात. सहा उपकेंद्रे असूनही एकाही उपकेंद्रावर लस उपलब्ध नाही. दर आठवड्याला केवळ १०० ...
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २३ खेडी येतात. सहा उपकेंद्रे असूनही एकाही उपकेंद्रावर लस उपलब्ध नाही. दर आठवड्याला केवळ १०० ते २०० लसी उपलब्ध होत असल्याने २० टक्केही लसीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी, किंबहुना आपल्याला आजार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ४०० ते ५०० नागरिक सकाळपासून ठाण मांडून बसतात. आता लस येईल, दुपारला येईल, या आशेवर दिवसभर लाइनमध्ये ताटकळत बसतात. यामध्ये ४५ वर्षांपासून ते ८०-८५च्या वयोवृद्धांचा समावेश असतो. मोहाडी येथील दोन वयोवृद्ध गेल्या सोमवारपासून दररोज लसीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात हजेरी लावतात. परंतु, त्यांना लस मिळाली नाही. आज त्या दोन वयोवृद्ध पतीपत्नीला लस टोचून घ्यावी लागली. असे कितीतरी वृद्ध आज लसीकरण केंद्रावर लसीकरिंता रांगेत ताटकळत उभे राहिले होते. दुपारी १२ पर्यंत लस उपलब्ध झाली नव्हती. त्यानंतर केवळ १०० लसी उपलब्ध झाल्याने १०० व्यक्तींनाच लस देण्यात आली. इतर नागरिकांना मात्र परत जावे लागले. दुसरी लस टोचून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यात नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. ३० एप्रिल राेजी नागरिकांना शांत करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते . बीट जमादार रामदास वैराळ आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना शांत करून सर्वांना लस मिळेल. परंतु, केवळ १०० डाेस मिळाल्याने अनेकांना परत जावे लागले.
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता राजकीय पक्षांनी पक्षभेद बाजूला सारून तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांत लस उपलब्ध करून द्यावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा.
अशोक खरात,
माजी सरपंच, शिंदी