२२ हजार हेक्टरवर बहरली रब्बीची पिके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 04:36 PM2020-01-31T16:36:24+5:302020-01-31T16:36:29+5:30
तालुक्यात २२ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे.
- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: गत पावसाळ्यात झालेला प्रचंड पाऊस बघता, चालु रब्बी हंगामात खामगाव तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्रापैकी सुमारे २५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पिके बहरली आहेत. सध्या पिकांची असलेली स्थिती पाहता, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे. तालुक्यात २२ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे.
खामगाव तालुक्यात साधारणपणे गत चार ते पाच वर्षांपासून रब्बीचे क्षेत्र सतत कमी झाले होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सातत्याने सामना करावा लागला. विशेष म्हणजे गतवर्षी रब्बीचा पेरा नसल्यासारखाच होता. परंतु गत पावसाळ्यात जिल्ह्यात सगळीकडेच प्रचंड पाऊस पडला. पावसाचे प्रमाण अति असल्याने शेतकºयांचा खरीप हंगाम पुर्णत: हातून गेला. एकही पिक समाधानकारक आले नाही. सगळीकडे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु हीच अतिवृष्टी रब्बी हंगामासाठी लाभदायक ठरत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यामुळेच खामगाव तालुक्यात गत पाच ते सहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी रब्बीचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला झाल्याचे दिसून येत आहे. कोणतेही नैसर्गिक संकट आले नाही, तर यावर्षी गहू, हरभरा उत्पादनात वाढ होईल, अशी आशा शेतकºयांना आहे. एकूण २२४०० हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असली तरी कांद्याची लागवड सुरूच असल्याने या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अशी झाली पेरणी
खामगाव तालुक्यात एकूण पेरणी योग्य क्षेत्र ७९ हजार हेक्टर आहे. यातील ११ हजार ९०० हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. ७ हजार हेक्टरवर हरभरा, १ हजार हेक्टरवर मका बहरला तर २ हजार ५०० हेक्टरवर कांदा पिकाचे नियोजन करण्यात आले आहे.