हा तर सत्ताधा-यांच्या विरोधातील वंचितांचा आक्रोश- मुकुल वासनिक

By admin | Published: August 30, 2016 01:33 AM2016-08-30T01:33:28+5:302016-08-30T01:33:28+5:30

काँग्रेसच्या आक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

This is a rage against the ruling-Mukul Wasnik | हा तर सत्ताधा-यांच्या विरोधातील वंचितांचा आक्रोश- मुकुल वासनिक

हा तर सत्ताधा-यांच्या विरोधातील वंचितांचा आक्रोश- मुकुल वासनिक

Next

चिखली(जि. बुलडाणा), दि. २९: भाजपा सरकार हे गोरगरिबांना आधार देण्याऐवजी अडचणीत टाकण्याचे काम करीत असून, सत्तेत येण्यापूर्वी आश्‍वासनांची खैरात भाजपाने घोषित केली होती; परंतु या आश्‍वासनांची पूर्तता करणे तर दूरच उलटपक्षी काँग्रेस सरकारने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या अनेक जनहिताच्या योजनाच वेगळय़ा पद्धतीने राबवून एकप्रकारे बंदच करण्याचा सपाटा सुरू केला आहे. गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचे भाजपाचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप करीत गोरगरीब जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या सरकारच्या विरोधात विचारांचा संघर्ष असाच चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी चिखली येथे भाजपा सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांनी पुकारलेल्या आक्रोश मोर्चाला संबोधित करताना केले.
चिखली येथील आक्रोश मोर्चाला विजय खडसे, नानाभाऊ गावंडे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, बाबूराव पाटील, जि.प.अध्यक्ष अलका खंडारे, श्याम उमाळकर, संजय राठोड, विजय आंभोरे, लक्ष्मण घुमरे, प्रदीप नागरे, मीनल आंबेकर, जयश्री शेळके, अंकुश वाघ, गणेश बस्सी, प्रा.नरेंद्र खेडेकर, बलदेव चोपडे, प्रकाश पाटील, मुक्त्यारसिंग राजपूत, नंदकिशोर बोरे, डॉ. सत्येंद्र भुसारी, दीपक रिंढे, अशोक पडघान, महेंद्र बोर्डे, प्रदीप पचेरवाल यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मोर्चाला संबोधित करताना मुकुल वासनिक म्हणाले की, भाजपावाले आम्हाला म्हणतात की, तुम्ही सरकारमध्ये असताना काय केले? आमच्या सरकारने या देशातील शेतकर्‍यांचे तब्बल ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, तर उलटपक्षी सध्याचे सरकार शेतकर्‍यांच्या जिवावर उठले असून, गरिबांच्या योजनांचा लाभ श्रीमताना देण्याचा कुटील डाव आखण्यास सुरुवात केली आहे. सोबतच सामाजिक व आर्थिक निकषावर आधारित असलेल्या जनगणनेचा गैरवापर या सरकारने चालविला असल्याचे स्पष्ट करून कॉंग्रेस कमिटीच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करून विविध आरोपांच्या फैरी झाडीत मोदी सरकारचा धिक्कार केला. जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजप सरकार अच्छे दिन आणणार असल्याचे सांगत होते; परंतु हे तर लुच्चे दिन आल्याचे दिसत आहे.. सरकारला या मोर्चाची दखल घेऊन या एसईसीसी याद्यांमध्ये बदल करण्यास भाग पाडू व यानंतरही सरकारने जनतेविरोधी निर्णय घेतला तर जिल्हा कॉंग्रेस कमिटी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील जिल्हाध्यक्ष आ.बोंद्रे यांनी यावेळी दिला. या सभेनंतर सरकारविरोधात घोषणा व नारे देत तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा यशस्वी करण्यासाठी चिखली कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Web Title: This is a rage against the ruling-Mukul Wasnik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.