राहुल बोंद्रे काँग्रेस मध्येच : मुकूल वासनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 01:44 PM2019-09-02T13:44:04+5:302019-09-02T13:44:31+5:30
येत्या निवडणुकीत पूर्वीपेक्षा जास्त यश जिल्ह्यात मिळणार असा आशावाद काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी चिखली येथे व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : भारतीय जनता पक्ष हा लोकांना दबावाखाली, विविध अमीष दाखवून त्यांच्या पक्षाकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब लोकशाही मूल्यांच्या विरोधात उचलेले पाऊल आहे. देशाच्या लोकशाहीला यातून कुठल्याही प्रकारची शक्ती मिळणारी नाही, असे स्पष्ट करतानाच आ. राहुल बोंद्रे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा खोडून काढताना त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील काँग्रेस सशक्त स्थितीत असून येत्या निवडणुकीत पूर्वीपेक्षा जास्त यश जिल्ह्यात मिळणार असा आशावाद काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी चिखली येथे व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमिवर मुकूल वासनिक यांनी १ सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा केला. देऊळगावराजा येथून त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत कार्यकर्त्यांना उभारी देण्यासह पक्षाच्या जडण-घडणींचा व स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, त्यांचे चिखली येथील विश्रामगृहावर आगमण झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शाम उमाळकर, मागासवर्गीय सेलेचे प्रदेशाध्यक्ष विजय आंभोरे, जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब गावंडे, प्रकाश धुमाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अनिता रनबावरे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, विश्रामगृहावर पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा संघर्ष राहू शकत नाही, या ना त्या मार्गाने सत्तेत बसावं, हा देखील राजकारणातील एकमेव उद्देश राहू शकत नाही, राजकारण म्हणजे एक वैचारिक संघर्ष असतो आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या वैचारिक संघर्षामध्ये पूर्णपणे समर्पित भावनेतून कामाला लागलो आहोत. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्टÑात काँग्रेस पक्ष सशक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.
भारतीय जनता पक्ष लोकांना आपल्या पक्षामध्ये खेचून आणण्यासाठी प्रयत्न करत असेल; पण मागील काळामध्ये आपण सर्वांनी पाहिले आहे की, भाजपाने प्रत्येकवेळी लोकांना दबावाखाली, अमिषे दाखवून स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब लोकशाही मूल्यांच्या विरोधात उचलेले पाऊल आहे. देशाच्या लोकशाहीला यातून कुठल्याही प्रकारची शक्ती मिळणारी नाही. अंतत: आम्ही या वैचारिक संघर्षामध्ये यशस्वी होवू, यामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह नाही, असे वासनिकांनी स्पष्ट केले. यासोबतच अनेक बाबींचा त्यांनी बोलताना उहापोह केला.
यावेळी तालुकाध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, काँग्रेसचे पालिका गटनेते रफीक कुरेशी, बाजार समितीचे सभापती सचिन शिंगणे, संजय पांढरे, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, सुधाकरराव धमक, समाधान सुपेकर, पप्पुसेठ हरलालका, सलीम मेमन, मोहन जाधव, प्रमीला जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)