काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल बोंद्रे
By Admin | Published: June 30, 2016 12:58 AM2016-06-30T00:58:53+5:302016-06-30T00:58:53+5:30
आमदारकीसोबतच संघटनात्मक जबाबदारी टाकण्यात आली.
बुलडाणा: काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी २९ जून रोजी काँग्रेसच्या सहा जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली. यावेळी बुलडाणा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या आमदार राहुल बोंद्रे यांना राजकारणाचा वारसा कुटुंबातून मिळाला आहे. अनुराधा परिवार, परमहंस मौनीबाबा संस्थान, तक्षशिला शिक्षण संस्था अशा विविध संस्थेच्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. राजकारणात सहभाग घेत त्यांनी प्रथम जनतेतून नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी पुढील दोन्ही विधानसभा निवडणुका जिंकल्या. विधानसभेत आपल्या विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. तालिका अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली. त्यामुळे त्यांची बुलडाणा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कॉग्रेसने नुकतेच राज्यातील महिलांच्या विविध आघाड्यांची नावे जाहीर केली. त्यानंतर आता सहा जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली आहे. त्यामुळे संघटनात्मक जबाबदारीबाबत काँग्रेस मंथन करीत आहे.