रेल्वे मालधक्क्यावरील हमालांचे काम बंद आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:04 AM2017-10-25T00:04:28+5:302017-10-25T00:04:48+5:30
खामगाव: हमालीचे दर कमी केल्याच्या कारणावरून येथील रेल्वे धक्क्यावरील माथाडी कामगार आणि हमाली व ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंत्राटदारांमध्ये वाद सुरू असून, कामगारांनी मागील आठ-नऊ दिवसांपासून रेल्वे धक्क्यावर काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

येथील रेल्वे धक्क्यावरील हमाली व ट्रान्सपोर्टचा कंत्राट नव्याने धुळे येथील जोशी फ्राइट क्लिचर कंपनीला मिळाला आहे. कंपनीकडून धक्क्यावरील हमालांच्या मजुरीत कपात करण्यात आल्याने या विरोधात धक्क्यावरील सर्व हमालांनी संताप व्यक्त करीत १६ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
अगोदर अमरावती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्टकडे हा कंत्राट होता. तेव्हा मजुरांना ७0 रुपये मेट्रिक टनप्रमाणे मजुरी दिली जात होती; मात्र जोशी फ्राइट क्लिचर कंपनी धुळेकडून नवीन दर जाहीर करण्यात आले असून, प्रती मेट्रिक टन फक्त २४ रुपये मजुरी देण्यात येत आहे. या विरोधात सर्व माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून, ऐन दिवाळीच्या दिवसात कामगारांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे रेल्वेच्या संबंधित अधिकार्यांनी लक्ष देऊन कामगारांना पूर्वीचे दर लागू करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी माथाडी कामगारांकडून होत आहे.