शेगाव रेल्वे ‘भुयारीमार्ग’ निर्मितीला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 03:17 PM2020-01-10T15:17:21+5:302020-01-10T15:17:27+5:30
उड्डाणपूलाजवळ भुयारी मार्ग बांधण्याच्या दृष्टिने स्थळ निरीक्षण करण्यात आले
शेगाव : उड्डाणपूलालगतच्या रहिवाशी लोकांसह शहरावासीयांसाठी महत्वपुर्ण असलेल्या भुयारीमार्गाच्या निर्मीतीला गती मिळत आहे. गुरूवारी सकाळी रेल्वे व नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यामूळे भुयारी मार्गाची निर्मीती होणार हे निश्चित दिसत आहे.
रेल्वेलाईनजवळील लोकांसाठी तसेच शहरातील नागरीकांच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून उड्डाणपूलाजवळ भुयारी मार्ग व्हावा, याकरीता प्रभाग १ व २ मधील रहिवासी नागरीकांसह या भागातील विविध पक्षाचे आजी व माजी राजकीय पदाधिकारी मागील दोन वर्षांपासून प्रयत्नरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.संजय कुटे, नगराध्यक्षा सौ.शकुंतलाताई बुच व उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कचरे यांच्या सकारात्मक भुमिकेमूळे येथील भुयारीमार्ग निर्मीतीचे काम मार्गी लागत आहे. गुरूवारी सकाळी रेल्वे विभागाचे अभियंता ठाकूर व नगर परिषदेचे अभियंता विजयकुमार आश्रमा, कनिष्ट अभियंता भालेराव यांनी पांडुरंग बुच, न.प.उपाध्यक्षा ज्योतीताई कचरे, सेना नगरसेवक तथा डीआरयुसीसी मेंबर दिनेश शिंदे, नगरसेविका वर्षाताई ढमाळ, नगरसेविका अलकाताई खानझोडे, आदी हजर होते.
उड्डाणपूलाजवळ भुयारी मार्ग बांधण्याच्या दृष्टिने आज सकाळी स्थळ निरीक्षण करण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याकरीता सकारात्मकता दाखविली आहे. स्थळ निरीक्षणानंतर उद्भवलेल्या तांत्रिक बाबींची पुतर्ता न.प.कडून ताबडतोब केली जाणार आहे.
- व्हि. एल.आश्रमा, अभियंता, बांधकाम विभाग न प शेगाव.