महामार्गासह सुमारे १२ गावांचा रस्ता रेल्वे प्रशासनाने केला बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:26 AM2017-10-25T00:26:46+5:302017-10-25T00:27:28+5:30
रेल्वे प्रशासनाने अनधिकृत दर्शवित २२ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत चांदुरबिस्वा येथील रेल्वे पुलाच्या कामाकरिता बंद करीत असल्याचे बॅनर पुलाजवळ लावले. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, या रस्त्यावरील वाहतूक ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहिल्यास शेतकरी, विद्यार्थी व जनतेचे हाल होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा: तालुक्यातील पूर्णाकाठच्या दहा ते बारा गावांना तालु क्याशी तसेच राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता वडनेर-चांदूर-हिंगणे गव्हाड-जिगाव हा रेल्वे प्रशासनाने अनधिकृत दर्शवित २२ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत चांदुरबिस्वा येथील रेल्वे पुलाच्या कामाकरिता बंद करीत असल्याचे बॅनर पुलाजवळ लावले. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, या रस्त्यावरील वाहतूक ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहिल्यास शेतकरी, विद्यार्थी व जनतेचे हाल होणार आहेत.
पूर्णाकाठची जिगाव, टाकळी, हिंगणे गव्हाड, खेडगाव, मोमीनाबाद, सावरगाव, ईसरखेड, पिंप्री ही गावे या रस्त्याने राष्ट्रीय महामार्गास जोडली गेली आहेत. तसेच येथूनच तालुका मुख्यालय नांदुरा येथे जनतेने जाणे-येणे असते. सदर रस्ता चांदुरबिस्वा येथे रेल्वे पुलाखालून जात असून, या रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने रेल्वे प्रशासनाच्या वतीने २२ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर १७ पर्यंत रेल्वे पुलाखालील अनधिकृत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याचे बॅनर सदर रस्त्याशेजारी रेल्वे पुलाजवळच लावले असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सदर रस्ता निर्मिती वेळी रेल्वे प्रशासनाची परवानगी घेण्यात आली नसल्याने रेल्वेच्या हद्दीमधील रस्ता अनधिकृत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर सदर रस्ता अधिकृत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. रस्ता अधिकृत असला तरी रेल्वेच्या हद्दीमधून रेल्वे पुलाखालून रस्ता करण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसल्यामुळेच रेल्वे प्रशासनाने रेल्वे पुलाखालील रस्ता अनधिकृत असून, पुलाच्या कामाकरिता तो बंद करीत असल्याचे बॅनर लावल्याची शक्यता आहे. सुरुवातीला पूर्णाकाठच्या गावांना जाण्यासाठी चांदुर-बिस्वा गावामधून रस्ता होता. १९९३-९४ मध्ये तत्कालीन जि.प. सदस्य संतोष पाटील यांनी पुढाकार घेत गावाच्या पश्चिमेकडून विश्वगंगा नदीकाठाने गावकर्यांच्या श्रमदानातून व ग्रा.पं.च्या सहकार्याने नवीन रस्त्याची निर्मिती केली. पुढे याच रस्त्याचे डांबरीकरण झाले व रेल्वे पुलाखालून हा रस्ता पूर्णाकाठच्या गावांना जोडण्यात आला. यावेळी रेल्वे प्रशासनाने सदर रस्ता चांदुरबिस्वा गावाच्या पूर्वेकडून २ कि.मी. अंतरावरुन रेल्वे क्रॉस करण्याची परवानगी देण्याची तयारी दर्शविली होती; परंतु तसे न होता विश्वगंगा नदीकाठावरून सदर रेल्वे पुलाखालूनच हा रस्ता तयार करण्यात आला असल्याने व रेल्वे दप्तरी पुलाखालील या रस्त्याची परवानगी दिली नसल्याने हा रेल्वे पुलाखालील रस्ता अनधिकृत आहे व पुलाच्या दुरुस्तीकरिता बंद करण्यात येत असल्याचे बॅनर लावण्यात आले असल्याचेही काही जाणकारांचे मत आहे.
रस्ते विकास योजनेंतर्गत सदर रस्ता मंजूर असून, तो राज्यमार्ग आहे. रस्ता अधिकृतच आहे.
-एम.एस. पुनसे
उपअभियंता, सार्व. बांधकाम खामगाव