आणखी आठ ठिकाणी रेल्वे आरक्षण मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 12:42 PM2020-07-12T12:42:06+5:302020-07-12T12:42:14+5:30
सोमवारपासून भुसावळ मंडळात ८ ठिकाणी सुरू असलेल्या प्रवाशी गाड्यांचे आरक्षण मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात प्रसार रोखण्यासाठी शासनाने रेल्वे प्रवाशी वाहतूक बंद केली. त्यानंतर काही प्रवाशी गाड्या सुरू झाल्या, त्या गाड्यांचे आरक्षण मिळण्याची सुविधा मर्यादित असल्याने आता सोमवारपासून भुसावळ मंडळात ८ ठिकाणी सुरू असलेल्या प्रवाशी गाड्यांचे आरक्षण मिळणार आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा या शहरांचा समावेश आहे.
प्रवाशी रेल्वेगाड्या बंद असल्याने रेल्वेस्थानकातील आरक्षण सुविधाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे लॉकडाऊन लागण्यापूर्वी आरक्षण केलेल्यांना ते रद्द करण्याची अडचण निर्माण झाली. तसेच देशभरात काही रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर त्या गाड्यांचे आरक्षित तिकिट मिळण्याची सुविधाही नव्हती. रेल्वे तिकिट आरक्षित करणे किंवा रद्द करणाऱ्यांनी या ठिकाणई येताना फिजिकल डिस्टन्स पाळणे, मास्क लावणे तसेच कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनांसह यावे, असे आवाहन मध्यरेल्वेच्या भूसावळ मंडळाकडून करण्यात आले आहे.
खामगाव, नांदुरा याठिकाणी आरक्षण
आता सोमवारपासून भूसावळ मंडळातील ८ ठिकाणी रेल्वे तिकिट आरक्षण सुरू होत आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा याठिकाणी आरक्षण खिडक्या सुरू होणार आहेत. सोबतच बोदवड, मूर्तिजापूर, कारंजा, रावेर, लासलगाव, निफाड येथेही ही सोय उपलब्ध होणार आहे.