पावसाचा कपाशीला फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:39 AM2017-10-13T01:39:28+5:302017-10-13T01:40:02+5:30
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनसह कापूस पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला असून, वेचणीसाठी तयार असलेल्या कापसाचे ३0 टक्के नुकसान झाले आहे. यावेळी तयार कापसाची प्रतवारी घसरली असून, शेतकर्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनसह कापूस पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला असून, वेचणीसाठी तयार असलेल्या कापसाचे ३0 टक्के नुकसान झाले आहे. यावेळी तयार कापसाची प्रतवारी घसरली असून, शेतकर्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.
जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक नदी, नाले वाहू लागले असून, काही तलाव भरले आहेत. याशिवाय शेतात पाणी साचले असून, सोयाबीन सोंगणीसह शेतातील विविध कामे ठप्प पडली आहेत. अवकाळी पावसापूर्वी काही दिवस कडक उन्हाने हजेरी लावल्यामुळे कपाशी पिकाला फायदा झाला होता. अनेक परिसरात पक्क्या झालेल्या कापसाच्या बोंडातून कापूस बाहेर पडला होता. दिवाळीपूर्वी कापसाची पहिली वेचणी झाल्यानंतर कापूस शेतकर्यांच्या घरात येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तीन दिवसांपासून येणार्या पावसामुळे कापूस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बोंडाबाहेर पडलेल्या कापसावर पाणी पडल्यानंतर पांढरा दिसणारा कापूस काळवंडला असून, त्याची प्रतवारी घसरली आहे. त्यामुळे या पांढर्या सोन्याला मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकर्यांवर येणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र सोयाबीन पिकापेक्षा जास्त २ लाख ५९ हजार ३४६ हेक्टर आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे शेतकर्यांचा कापूस पिकाकडे कल वाढला होता. यावर्षी सोयाबीनपेक्षा कापूस पीक चांगले येईल, असा अंदाज व्यक्त होत असताना अवकाळी पावसाने चांगलाच फटका दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी कापूस पिकांची पहिली वेचणी होऊन कापूस घरात येईल, अशी अपेक्षा असताना सोयाबीन सोंगणीच्या काळात अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकर्यांना फटका दिला आहे. शेतात काही शेतकर्यांची सोयाबीन सोंगणी सुरू असताना उभ्या असलेल्या कापसाच्या पिकाला पावसाने फटका दिला आहे. येणार्या काही दिवसात पाऊस न थांबल्यास शेतकर्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
सोयाबीन, कपाशी, मका पिकांना फटका
धामणगाव बढे: गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने परिसरातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन शेतात भिजत असून, शेकडो हेक्टरवरील कापूस व मक्याचे पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सुरुवातीला अल्पसा पाऊस पडला. त्यामुळे उत्पन्नामध्ये अगोदरच घट झाली. त्यानंतर परतीच्या पावसाने उद्ध्वस्त होत आहे. मागील चार दिवसांपासून धा.बढे, किन्होळा, सिंदखेड, पिंपळगावदेवी, पिंप्रीगवळी, पोफळी, ब्राम्हंदा, रोहिणखेड परिसरात दररोज मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला आहे. अनेक शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणात सोयाबीन, मका शेतात कापून ठेवले आहे. सततच्या पावसाने ही पिके सडत आहेत, तर त्यांना कोंब येत आहेत. सततच्या पावसामुळे कामे बंद आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतामध्ये पाणी साचले आहे. सुरुवातीचा अत्यल्प पाऊस, घटलेले उत्पन्न, मालाचे पडलेले भाव, वाढता खर्च व त्यात परतीच्या पावसाने होणारे नुकसान यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
धाड परिसरात पिके गेली वाहून
धाड : मुसळधार पावसाने तालुक्यात थैमान घालत, शेतकर्यांची पुरती दैना केली आहे. बुधवारी दुपारी जोरदार पावसानंतर आलेल्या पुरामुळे परिसरातील शेतांमधील मक्याचे पीक व कृषी साहित्य वाहून गेले. गत चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात नदीनाल्यांना पूर आले आहेत. जोरदार पावसाने बाणगंगा नदीस मोठा पूर आला. या पुराचे पाणी नदीलगत असणार्या धाड येथील शेतकरी गणेश बंडू गायकवाड यांच्या शेतात शिरले व संपूर्ण शेतातील पीक वाहून गेले. गणेश गायकवाड यांनी तीन एकरावर मका पिकाची लागवड केली होती. ती सोंगणी करून चारा व कणसे शेतात पडून होती. पुराच्या पाण्याचा वेग आणि व्याप्ती मोठीच असल्याने काही वेळातच तीन एकरावरील संपूर्ण मका पीक चार्यासह वाहून गेले. शेतात सोंगणी केलेला तब्बल एक लाखाच्या शेतमालाचे पुरामुळे नुकसान झाले., तसेच येथे त्यांचे स्प्रिंकलरचे १६ पाइप, एक मोटरपंप असे कृषी साहित्य पुराचे पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे नुकसान झाले.