पावसाच्या दडीचा वृक्षारोपणाला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2017 01:00 AM2017-07-12T01:00:03+5:302017-07-12T01:00:03+5:30

पंधरा दिवसांपासून पावसाची दडी : रोपे सुकली!

Rain fall of tree plantation! | पावसाच्या दडीचा वृक्षारोपणाला फटका!

पावसाच्या दडीचा वृक्षारोपणाला फटका!

Next

हर्षनंदन वाघ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात चार कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेत विविध शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. परिणामी, जिल्हा प्रशासनाने ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवडीची उद्दिष्टपूर्ती करून भरीव कार्य केले; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे या वृक्षारोपण मोहिमेला फटका बसण्याची शक्यता असून, अनेक ठिकाणी मोहिमेदरम्यान लावण्यात आलेली रोपे कोमजण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार तथा वस्रोद्योग विभाग, शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग, गृह विभाग, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, महावितरण, अन्न औषध प्रशासनाचे दवाखाने, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कारागृह विभाग, परिवहन विभागाचे राज्य परिवहन विभाग व उप प्रादेशिक परिवहन विभाग, विधी न्याय विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे सिंचन विभाग व पाटबंधारे तसेच कौशल्य विकास विभाग, महसूल विभाग, बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, केंद्र सरकारचे बीएसएनएल व जिल्हा डाक कार्यालय, क्रीडा विभाग तसेच ग्राम विकास विभाग या प्रशासनाच्या मुख्य २६ यंत्रणा मोहिमेत सहभागी झाल्या. या २६ यंत्रणेच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टपूर्ती करीत ८ लाख ६८ हजार ९८२ म्हणजे १.२१ टक्के वृक्ष लागवड केली आहे.
मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी झालेल्या पिकांसह वृक्षारोपण मोहिमेला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत सरासरी १९८.९ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत २५८५.८ मि.मी. म्हणजे सरासरी १९८.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. पावसाच्या दडीचा फटका शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेला बसण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक तालुक्यात आतापर्यंत झालेला पाऊस अल्प आहे. त्यात बुलडाणा तालुक्यात २८९ मि.मी., चिखली २२४ मि.मी., देऊळगाव राजा १६५ मि.मी., लोणार २२१ मि.मी., मेहकर २७७ मि.मी., खामगाव १८२.४ मि.मी., शेगाव १२२ मि.मी., मलकापूर १२६ मि.मी., नांदुरा २४१ मि.मी., मोताळा २१३ मि.मी., संग्रामपूर ९८ मि.मी., जळगाव जामोद २०८ मि.मी., असा एकूण २५८५.८ म्हणजे सरसरी १९८. ९ मि.मी., पाऊस झाला आहे.

रोपांसाठी नियमित १० मि.मी. पावसाची गरज
वृक्षारोपण करताना प्लास्टिकच्या पिशवीतून रोप मातीच्या गोळ्यासह बाहेर काढण्यात येते. त्यामुळे वृक्षारोपण करताना मातीच्या गोळयाचा ओलावा असतो. हा ओलावा दोन दिवस टिकत असते. त्यानंतर रोपांसाठी नियमित दोन दिवसाआड १० मि.मी. पाण्याची गरज असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पाणी देऊ शकत नसल्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. जिल्ह्यात १ ते ७ जुलै दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले; मात्र मागिल १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वृक्षारोपण मोहिमेतील वृक्ष रोपे कोमजण्याच्या मार्गावर आहेत.

यावर्षी वृक्षारोपण मोहिमेला सर्वांनी सहकार्य केल्यामुळे उद्दिष्टपूर्वी झाली आहे; मात्र पाऊस नसल्यामुळे रोपावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. मोहिमेदरम्यान मातीच्या ओल्या गोळ्यासह जमिनीत वृक्षारोपण करण्यात येते. या मातीच्या गोळ्याची ओल दोन दिवस टिकते; मात्र जास्त दिवस पाणी न मिळाल्यास रोपावर परिणाम होऊ शकतो.
- जी. ए. झोळे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी, बुलडाणा.

Web Title: Rain fall of tree plantation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.