बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 03:42 PM2020-10-12T15:42:46+5:302020-10-12T15:43:02+5:30
फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोंगून ठेवलेल सोयाबीन व नुकताच फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही खरीप हंगामाच्या शेतीमालाच्या नुकसानाची पुनर्रावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. परीणामा अंतिम पैसेवारीलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
यंदाही आगामी पाच दिवस विदर्भामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. सप्टेंबरमध्ये पिकाला लागलेल्या शेंगातील दाण्यांनाच कोंब फुटले होते. सध्या सोंगलेले सोयाबीन हे जमीनीवरच असल्याने त्याला फटका बसून प्रतवारी घटण्याची भीती आहे. रविवारी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा परतीचा पाऊस झाल्यामुळे शेतातील सोयाबीनच्या सुड्या भिजल्या. नुकतीच फुटलेली कापसाची बोंडेही फुटल्याने नुकसान झाले. काही ठिकाणी बोंडे काळवंडल्याचे दिसून येत आहे.
बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद, नांदुरा, शेगाव, लोणार, देऊळगाव राजा, मेहकर , संग्रामपूर, नांदुरा तालुक्यातही हा पाऊस जोरदार बरसला त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. येत्या पाच दिवसातही परतीचा पाऊस मुसळधार बरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील स्थिती ही या परतीच्या पावसासाठी पोषक असल्याने क्यार व महा चक्रीवादळाप्रमाणेच यंदाही हा पाऊस बरसून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मका, कापूस, तूर, सोयाबीन व भाजीपाला पिकांचेही नुकसान होत आहे. जिल्ह्यात यंदा तीन लाख ६६ हजार हेक्टरवर सोयाबीन तर १.९४ लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला असून त्याला या पावसाचा फटका बसण्याची भीती आहे.
तर गेल्या वर्षी ४७८ कोटी रुपयांचे नुकसान ११ दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात झाले होते.