प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:43+5:302021-02-27T04:46:43+5:30
माेताळा : नगरपंचायतच्या १५ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या याद्यांमध्ये भरपूर प्रमाणात घोळ असून मतदारांचे ...
माेताळा : नगरपंचायतच्या १५ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या याद्यांमध्ये भरपूर प्रमाणात घोळ असून मतदारांचे नाव दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीत गेल्याने शहरातील ६६९ नागरिकांनी प्रारूप मतदार यादीवर हरकती घेऊन आपले मतदान वास्तव्यास असलेल्या प्रभागाच्या मतदार यादीत नाव टाकण्यासाठी नगरपंचायतला विनंतीअर्ज दिले आहे.
मोताळा नगरपंचायतची निवडणूक जवळ येत असून प्रभागाच्या सीमा ठरवून प्रभागाच्या रचना होऊन १५ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तर २२ फेब्रुवारीपर्यंत त्या मतदार याद्यांवर हरकती घेण्यात येणार असून त्यानंतर १ मार्चला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असून त्यामध्ये प्रभागाच्या ठरवून दिलेल्या चतु:सीमेच्या आतील प्रभागात राहणाऱ्या नागरिकांचे मतदान हे इतर प्रभागाच्या मतदार यादीत गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरातील तब्बल ६६९ नागरिकांनी नगरपंचायती गाठून अर्ज देण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले असून त्या अर्जामध्ये नागरिकांनी इतर प्रभागात गेलेल्या मतदार याद्यांमधील नावे ही नागरिक वास्तव्यास असलेल्या तसेच नगरपंचायतने ठरवून दिलेल्या सीमेच्या आतील प्रभागाच्या मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याचे विनंती अर्ज दिले आहे. तसेच अर्ज देताना नागरिक नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना आमची नावे इतर प्रभागात गेली कशी, हा अनुत्तरित प्रश्न विचारत होते. त्यावर नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी चुप्पी साधल्याचे पहायला मिळाले आहे तर शहरातील नागरिकांनी आपले मतदान वास्तव्यास असलेल्या तथा नगरपंचायतने ठरवून दिलेल्या सीमेच्या आतील प्रभागात नेण्यासाठी शहरातील ६६९ नागरिकांनी दिलेल्या अर्जावर नगरपंचायत प्रशासनाने हरकत घेऊन दिलेल्या अर्जदाराच्या वास्तव्यास असलेल्या घराचे स्थळपाहणी करून अहवाल सादर करण्याचे कर्मचाऱ्यांना आदेशित केले आहे.
१ मार्चला अंतिम यादी
आलेल्या हरकतअर्जावर व स्थळपाहणी अहवालांवरून नगरपंचायतचे प्रशासक तथा मलकापूर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २३ ते २८ फेब्रुवारीदरम्यान सुनावणी होऊन नागरीक सध्या वास्तव्यास असलेल्या प्रभागातील मतदार यादीत त्यांची नावे टाकून अंतिम मतदार यादी १ मार्च राेजी प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.