सोन्याच्या मण्यांचा पाऊस! ऐकताच नागरिकांची हायवेवर झुंबड उडाली; ज्याच्या त्याच्या हाती मणी...
By संदीप वानखेडे | Updated: August 12, 2022 12:35 IST2022-08-12T12:34:23+5:302022-08-12T12:35:02+5:30
महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्सपासून ते मांदणी फाट्यापर्यंत काही जण सोन्याचे समजून नकली मणी उचलत होते़.

सोन्याच्या मण्यांचा पाऊस! ऐकताच नागरिकांची हायवेवर झुंबड उडाली; ज्याच्या त्याच्या हाती मणी...
राज्यात सध्या पावसाचा हाहाकार सुरु आहे. बांद्यापासून ते अगदी गडचिरोलीपर्यंत पाणीच पाणी झालेले आहे. यामुळे लोक घरात आसरा घेत आहेत. असे असताना राज्यातील एका जिल्ह्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस पडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि बघताबघता कामधाम सोडून लोकांनी थेट हायवे गाठत मणी शोधायला सुरुवात केली.
प्रकार आहे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातला. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या औरंबागाद-नागपूर राज्य महामार्गावरील मादणी फाट्याजवळ (Mumbai Aurangabad Nagpur Highway) डोनगावजवळ 10 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. महामार्गाच्या बाजुला काहींना सोन्यासारखे दिसणारे मणी पडलेले दिसले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्सपासून ते मांदणी फाट्यापर्यंत काही जण सोन्याचे समजून नकली मनी उचलत होते़. हायवेवरून ये-जा करणारे, गावातील लोक साचलेल्या पाण्यात देखील हे मणी शोधू लागले. गाड्या रस्त्यावर लागल्याने वाहतूकही खोळंबली. हे मणी विखुरलेले असल्याने जो तो इकडे तिकडे टकमक पाहत, मिळाला रे मिळाला असे ओरडत आनंद व्यक्त करत होता.
अखेर पोलिसांना या ठिकाणी यावे लागले. पोलिसांनी हे मणी खरेच सोन्याचे आहेत का हे तपासले. तर ते नकली असल्याचे समोर आले. ते सोन्याचे नव्हतेच तर सोन्याचा मुलामा दिलेल्या वेगळ्याच धातूचे होते. आता या लोकांची पंचाईत झाली. हातात सोन्याचे मणी पण ते सोन्याचे नाहीत, आता करायचे तरी काय लोकांनी व्हिडीओ काढले, सोशल मीडियावरही पोस्ट झाले.
अफवांचा बाजार पसरला
सोन्याचे मणी पाहून यावर मंथन सुरू झाले़ कोणी म्हणत की मोटारसायकल वरून महिला चालली असेल तिच्या गळयात असलेली एकदानी पोथ तुटून पडली असेल तर काहींनी चोरट्यानी पोलिसांच्या धाकाने कोणी सोन्याचे मणी फेकून दिले असतील असे विविध तर्क वितर्क लावत होते़ मात्र काहींनी मणी फोडून पाहिल्यावर तो चपटा न होता सरळ फुटून तुकडे तुकडे झाले़ ज्याने सापडलेले मणी सोन्याचे नव्हते तर सोन्या सारखे दिसणारे नकली होते याची खात्री पटली जीवाचे हाल करून मणी वेचणाऱ्याना स्वत:वरच हसू यायला लागले़.