पाऊस थांबला, शेतकऱ्यांचा संघर्ष कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 02:24 PM2019-11-13T14:24:54+5:302019-11-13T14:25:01+5:30
अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या सुड्या शेतातच सडल्या आहेत. त्यामुळे आता पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकºयांचा संघर्ष सुरूच आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात अति पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फेरले आहे. शेत आणि शेतरस्ते जलमय झालेले आहेत. पावसाच्या ताडाख्यातून उरला-सुरला शेतमाल घरी आणणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. अनेक शेतामध्ये सोयाबीनच्या सुड्या शेतातच सडल्या आहेत. त्यामुळे आता पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकºयांचा संघर्ष सुरूच आहे.
जिल्ह्यात पावसाने ९० टक्क्यापेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या शेतकºयांच्या डोळ्यासमोरून शेतातून वाहून गेल्या. जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान
झाले आहे़ मका, कापूस, ज्वारी आणि सोयाबीनचे हाताशी आलेले उत्पादन शेतकºयांना गमवावे लागले आहे़ सध्या पावसाने उघडीप दिली आहे. मात्र शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकºयांना पाय ठेवायला जागा सुद्धा राहिली नाही. शेतातील दलदल पाहून शेतात पावसापासून वाचलेला काही माल घरी आणणे अवघड होऊन बसले आहे. अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या शेतातच उभ्या आहेत. सोयाबीनच्या सुड्या काढण्यासाठी एकही मळणीयंत्र शेतात पोहचू शकत नाही. काही सोयाबीनच्या सुड्या तर जाग्यावरच काळवंडल्या आहेत. त्यामुळे अशा सोयाबीनच्या सुड्या काढाव्या की, नाही हाच मोठा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.
शेतमाल घरापर्यंत पोहोचणार का?
अनेकांच्या शेतात आजही सोयाबीनच्या सुड्या लागलेल्या आहेत. तो शेतमाल घरापर्यंत पोहचेल की नाही याची शाश्वती राहिली नाही. शेत आणि शेतरस्ते जलमय झाल्याने शेतात ट्रॅक्टर किंवा मळणीयंत्रण जाऊ शकत नाही. गेल्यास ते ट्रॅक्टर फसण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत.
एकाच ठिकाणी बसून तलाठी जुळवताहेत शेतकºयांच्या याद्या
पावसाने झालेल्या नुकसानानंतर शेतकºयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून मोठी तत्परता दाखवण्यात आली. त्यासाठी सर्वेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. परंतू अनेक तलाठी एकाच ठिकाणी बसून शेतकरी आणि त्यांचा पेरा याची यादी तयार करताना आढळून आले. मेहकर तालुक्यातील काही गावांमध्ये तलाठ्यांनी शेतात न जाताच गावात बसूनच याद्यांची जुळवाजुळव केल्याचे दिसून आले.