अंढेरा परिसराला वादळी पावसाचा फटका; टिनपत्रे उडाली, घरांचेही नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 04:38 PM2018-06-01T16:38:53+5:302018-06-01T16:38:53+5:30
बुलडाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावाच्या परिसरात दुपारी जवळपास पास दोन तास वादळी पाऊस होऊन गावातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
बुलडाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावाच्या परिसरात दुपारी जवळपास पास दोन तास वादळी पाऊस होऊन गावातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नसले तरे गारपीटीचा काही नागरिकांना मुका मार लागला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. जानेफळ, डोणगाव, चिखली परिसरात ३१ मे रोजी सायंकाळी सुमारे अर्धातास पाऊस पडला होता. त्यानंतर देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गाव परिसरात एक जून रोजी दुपारी दोन ते पावणे चार दरम्यान वादळी वार्यासह गारपीट व नंतर संततधार पाऊस पडला. यामुळे गावातील अनेक नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली असून गावातील मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. दरम्यान, गावाला वीज पुरवठा करणारे वीज रोहीत्रही जमीनदोस्त झाल्याने गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अंढेरा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील कमानही या वादळी वारे व पावसामुळे अक्षरश: अर्धी वाकली आहे. त्यामुळे या वादळी वार्यांच्या वेगाची कल्पना यावी. वृत्त लिहीपर्यंत या वादळी वारा व गारपीटीमध्ये कोणी गंभीर जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे ३१ मे रोजी चिखली तालुक्यातील पळसखेड नजीक सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वादळी वारे व पावसादरम्यान बाभळीची झाडे पडल्याने अर्ध्या तापापेक्षा अधिक काळ वाहतूक ठप्प होती. विजांच्या गडगडाटासह हा पाऊस पडला होता. त्यामुळे चिखली शहरा नजीकच्या परिसरातील शेतशिवारात पाणी तुंबले होते. दुसरीकडे जानेफळ ३१ मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पडलेल्या पावसादरम्यान वीज कोसळून बारकू इंगळे यांचा बैल दगावला आहे. डोणगावमध्येही पावसाची भूरभूर मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरातही गुरूवारी पावसाची भुरभूर सुरू होती. दरम्यान, शुक्रवारीही दुपारी गावपरिसरात पावसाने हजेरी लावली. दरम्यान गुरूवारी रात्री साडेआठ वाजता वीज पुरवठा खंडीत झाला होतो. तो अद्याप पूर्ववत झालेला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.