पावसाचा खंड, पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:39 AM2021-08-17T04:39:53+5:302021-08-17T04:39:53+5:30
अगोदरच गतवर्षी खरीप हंगामातील पिके बहरात आली असताना अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन व मुगाच्या झाडाच्या शेंगाला कोंब आले असल्यामुळे पिकाची ...
अगोदरच गतवर्षी खरीप हंगामातील पिके बहरात आली असताना अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन व मुगाच्या झाडाच्या शेंगाला कोंब आले असल्यामुळे पिकाची नासाडी झाली आहे. लागवडीला लागलेला खर्चसुद्धा वसूल झाला नव्हता. तरीपण गतवर्षीच्या कटू अनुभवांना मूठमाती देऊन यावर्षी बळीराजाने नव्या उमेदीने बँकेचे, सावकाराचे कर्ज काढून महागडी बियाणे आणून मृग नक्षत्राच्या शेवटी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील तूर, कपाशी, सोयाबीन, उडीद, मुंग इतर पिकाची पेरणी केली. पावसाने खंड दिल्यामुळे उडीद, मूग, कपाशी या पिकावर मावा व अळी पडल्याने बळीराजाने महागडी औषधे आणून फवारणी करून कोळपणी व निंदणी इतर अंतरमशागतीची कामे उरकली. सोयाबीनला भाव जास्त असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा सुद्धा वाढवला. सध्या परिसरातील सोयाबीन फुलात आले असून, मुगाला शेंगा लागल्या आहेत, परंतु वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने दडी मारली व सूर्य आग ओकत असल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. खरिपाची पिके पावसाअभावी सुकत चालली असून, उन्हामुळे संकटात सापडली असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे