जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By admin | Published: July 17, 2017 02:07 AM2017-07-17T02:07:28+5:302017-07-17T02:07:28+5:30

बुलडाणा, मेहकर, लोणार परिसरात दमदार पाऊस

Rainfall of rain everywhere in the district | जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारपासून रिमझिम स्वरूपात हजेरी लावली होती. दरम्यान, आज १६ जुलै रोजी दुपारी २ वाजेपासून बुलडाणा परिसरासह अनेक तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. या पावसामुळे जवळपास ५ हजार हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले असून, बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात यावर्षी वेळेवरच जूनला मान्सूनच्या पावसाने सुरुवात झाली होती. जवळपास दोन ते तीन दिवस चांगला पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी महागडी खते, बियाणे खरेदी करून जवळपास पाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली; परंतु ही पिके जमिनीवर येत नाही तोच, पावसाने पंधरा दिवसांपासून दडी मारली. त्यातच दररोज कडक उन्ह पडत असल्यामुळे नुकतेच जमिनीवर आलेली पिके कोमेजली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. कमी पाऊस झाल्यामुळे जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या होत्या. त्यामुळे अनेक तालुक्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले होते; परंतु बुधवारपासून अनेक तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे ५ लाख हेक्टरवरील पिकांना दिलसा मिळाला होता. दरम्यान, १६ जुलै रोजी बुलडाणा, मेहकर, लोणार परिसरात जवळपास दोन तास दमदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणचे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले.
या शिवाय मोताळा, देऊळगावराजा, चिखली, सिंदखेडराजा तालुक्यात ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले असून, रखडलेल्या दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्यांना सुरुवात झाली आहे. शिवाय पाच लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळाले आहे. वास्तविक जिल्ह्यातील पावसाचे सरासरी प्रमाण हे ७१२.७ एवढे आहे; परंतु पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेला असतानादेखील आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २२४.८ मिमी पाऊस झाला आहे.

घाटाखाली संततधार
खामगाव: गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी दुपारी घाटाखालील काही तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. घाटाखालील संग्रामपूर तालुका वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये रविवारी दुपारी १२.३० वाजतापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने परिसरात काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्याची स्थिती होती. या पिकांना आता पावसामुळे संजीवनी मिळाली असून, खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली असली तरी, संग्रामपूर तालुक्याला पावसाची प्रतीक्षा आहे.

नुकसान कोठेही नाही
जिल्ह्यातील काही तालुक्यात बुधवारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. दरम्यान, रविवारी दुपारी बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी नदी, नाले वाहू लागले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरले होते; मात्र कोठेही नुकसान झाले नाही.

Web Title: Rainfall of rain everywhere in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.