पावसाचा पिकांना फटका: विमा कंपनीकडे नुकसान नोंदविण्याची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 03:56 PM2020-08-22T15:56:40+5:302020-08-22T15:56:54+5:30
आॅनालाईन नोंदणीसाठी अडचण आल्यास कृषी सहाय्यकांकडे नुकसान झाल्याच्या ७२ तासात माहिती देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे उडीद, मूग पिकाचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी विमा कंपनीकडे आॅनलाइन नुकसान नोंदविण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. आॅनालाईन नोंदणीसाठी अडचण आल्यास कृषी सहाय्यकांकडे नुकसान झाल्याच्या ७२ तासात माहिती देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. सध्या बºयाच भागामध्ये नुकसानाची महसूल विभागाकडून पाहणी सुरू आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या मूग, उडीद, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे बºयाच ठिकाणी पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. मूग, उडीद पिकाला कोंब आले आहेत. सोयाबीनही पिवळे पडल्याचे दिसून येते. अतिपावसाने धरणातील पाण्याचा साठा पूर्ण भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या शेतीमध्ये देखील पाणी जाऊन पिकांचे नुकसान झाले आहे.
पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणची जमीन खरडून गेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा किंवा जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानाचा अहवाल आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे देणे आवश्यक आहे. ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी क्रॉप इन्शुरन्स अॅप्लीकेशन या मोबाईल अॅपद्वारे आॅनलाइन आपले नुकसान नोंदवावे, पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर पिकाच्या झालेल्या नुकसानाची माहिती देण्यात यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पीक विमा कंपनीकडे आॅनलाइन माहिती भरल्या न गेल्यास कृषी सहाय्यक यांच्याकडून नुकसान नोंदणीकरीता सूचना पत्राचा अर्ज प्राप्त करून घेऊन तो अर्ज भरून कृषी सहाय्यक यांच्याकडे देणे आवश्यक आहे.
नदीकाठच्या शेतीचे नुकसान
मेहकर तालुक्यातील अतिपावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील भालेगाव, पाचला, रायपूर, गवंढाळा, फरदापुर येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मेहकर व लोणार तालुक्यात आठवडाभर संततधार पाऊस झाल्याने अनेक धरणाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावाच्या शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानाचे पंचनामा करण्याचे निर्देश महसूल विभागाला देण्यात आले आहेत.