ऐन सण- उत्सवांच्या काळात पावसाचा फुलशेतीला फटका, भावात दुपटीने वाढ
By विवेक चांदुरकर | Published: September 18, 2023 01:57 PM2023-09-18T13:57:16+5:302023-09-18T13:57:28+5:30
फळांच्या भावातही वाढ
खामगाव : गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फूलशेतीला मोठा फटका बसला आहे. हरतालिका व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांची आवक घटली असून, भावातही दुपटीने वाढ झाली आहे. डाळींबाचे दर तिप्पट झाले आहेत. पूर्वी ७० ते ७५ रूपये किलो असलेल्या डाळींबाचे दर आता २०० रूपये किलो झाले आहेत.
शुक्रवार, शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे फुल उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे फुले सडली आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकरी झेंडू, गुलाब, लिलीसह फुलांची शेती करतात. तसेच खामगावात पुणे, नाशिकसह अन्य शहरातून फुले मागविण्यात येतात. सण उत्सवांच्या काळात फुलांना चांगली मागणी असते. या दिवसांमध्ये चांगली विक्री होते. त्या आशेवर शेतकरी असतात. मात्र, पावसाने फुले झाडांनाच काळी पडली आहेत.
तसेच फुले सडली असल्याने शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. झेंडूची फुले २०० रूपये किलो, गुलाबाचे फूल पाच रूपयांना एक मिळत आहे. तर शेवंतीचे दर २५० रूपये किलो झाले आहेत. लिलीच्या ५० फुलांची गड्डी १०० रूपयांना मिळत आहे. तसेच फळांच्या दरातही वाढ झाली आहे. डाळींबाची आवक घटली असून, दरही वाढले आहेत. एक महिन्याआधी ७० ते ७५ रूपये किलो असलेल्या डाळींबाचे दर २०० रूपये किलो झाले आहेत. केळी ४० ते ५० रूपयांना एक डझन, सेफ १२० रूपये किलो, चिकूचे दर १२० रूपये किलो झाले आहेत. चिकुच्या दरातही ३० ते ४० रूपयांनी वाढ झाली आहे. वाढत्या महागाइचा ग्राहकांना फटका बसत आहे.
खामगाव शहरात ग्राहकांची गर्दी हरतालिका व गणेश उत्सवासाठी खरेदी करण्याकरिता खामगाव शहरातील अग्रसेन चाैक, मुख्य बाजार लाइन, फरशी परिसर, जलंब नाका परिसरात ग्राहकांची गर्दी झाली होती. पोलिस स्टेशनपासून तर फरशी परिसरपर्यंत हरतालिकासाठी लागणार्या विविध वनस्पतींची विक्री करणारी दुकाने लागली होती. ग्रामीण भागातील महिलांनी केळीची पाने, सिताफळसह विविध वनस्पती विक्रीसाठी आणल्या होत्या. सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी ४ वाजेपर्यंत शहरात ठिकठिकाणी दुकाने लागली होती. सण उत्सवामुळे फळांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
शेतकरी व ग्राहकांना फटका पावसामुळे फूल उत्पादक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. फुले झाडालाच काळी पडली आहेत. त्यामुळे हजारो रूपये खर्च करून शेतकर्यांना आवक घटडली असल्याने भाववाढ झाली आहे. भाव वाढल्याने ग्राहकांनाही फटका बसत आहे.
पावसाने फुलांचे नुकसान झाले आहे. फुलांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र त्याचा फायदा शेतकर्यांना कमी तर व्यापार्यांनाच जास्त होत आहे. ग्राहकांनाही त्याचा फटका बसत आहे. - पदमाकर खुमकरफुल उत्पादक शेतकरी, जलंब