रायपूर पोलीस स्टेशन, निवासस्थानासाठी निधी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:59+5:302021-01-08T05:52:59+5:30
विधान भवनात ५ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत आ. श्वेता महाले यांनी ना.अनिल देशमुख यांची भेट घेऊन रायपूर पोलीस स्टेशन ...
विधान भवनात ५ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत आ. श्वेता महाले यांनी ना.अनिल देशमुख यांची भेट घेऊन रायपूर पोलीस स्टेशन व कर्मचारी निवासस्थानाबाबतच्या मागणीचे पत्र सादर केले. रायपूर येथील पोलीस स्टेशन १ मे २००८ पासून स्वतंत्र पोलीस स्टेशन म्हणून स्थापना झालेली आहे. तर रायपूर हे अतिसंवेदनशील असल्याने १९१२ पासून चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत ब्रिटिश काळापासून स्वतंत्र पोलीस चौकी अस्तित्वात आहे. गावाला लागूनच सैलानी बाबांचे जगप्रसिद्ध सर्वधर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरते. अमावास्या व पौर्णिमेला हजारो लोक दर्शनासाठी येत असल्याने पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजासाठी इमारत नसल्याने रायपूर पोलीस स्टेशनचे काम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये सुरू आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन तथा आरोग्य यंत्रणा या दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांना काम करणे अडचणीचे होते. पोलीस कर्मचाऱ्यांना रायपूर येथे निवासस्थान नसल्याने मुख्यालयी राहणे अडचणीचे ठरते. रायपूर येथे गृह विभागाची पोलीस स्टेशन व कर्मचारी निवासस्थानासाठी २० गुंठे जागा उपलब्ध आहे; परंतु पोलीस स्टेशन इमारत आणि कर्मचारी निवासस्थानासाठी निधी उपलब्ध नसल्याने आतापर्यंत स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात आलेले नाही. या सर्व बाबीचा विचार होऊन रायपूर येथील पोलीस स्टेशन इमारत बांधकाम आणि कर्मचारी निवासस्थानासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देऊन बांधकाम सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव मागविण्यात यावे, अशी मागणी आ. महाले यांनी या पत्राद्वारे केली आहे.