मानसिक आरोग्य उपाययोजनेचा वस्तुपाठ उभा करा - अविनाश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 03:24 PM2018-03-13T15:24:07+5:302018-03-13T15:24:07+5:30
बुलडाणा : सैलानी बाबा दर्ग्याच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर प्रबोधन, शिक्षण आणि शास्त्रीय उपाययोजना करण्याचा वस्तुपाठ मानसमित्राच्या माध्यमातून जिल्हावासीयांनी येत्या कालावधीत देशासमोर उभा करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
बुलडाणा : सैलानी बाबा दर्ग्याच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर प्रबोधन, शिक्षण आणि शास्त्रीय उपाययोजना करण्याचा वस्तुपाठ मानसमित्राच्या माध्यमातून जिल्हावासीयांनी येत्या कालावधीत देशासमोर उभा करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मानसिक आरोग्य प्रकल्प विभागांतर्गत मानसमित्र कार्यशाळेचे आयोजन प्रगती सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.संतोष आंबेकर होते. अविनाश पाटील पुढे म्हणाले की, सैलानीबाबा दर्ग्यावर होत असलेल्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा बुलडाणा जिल्ह्यासाठी भूषणावह नसून दूषणावह आहेत. हे मोकळ्या मनाने सर्वांनी स्वीकारणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य या विषायावरील समाजाचे आकलन तयार करण्यासाठी या मानसमित्र कार्यशाळेला मुख्य मार्गदर्शन डॉ. प्रदीप जोशी यांचे लाभले. त्यांनी मन, मनाचे आजार व मानवी वर्तणूक या बद्दलचे सविस्तर मार्गदर्शन केले. उद्घाटक म्हणून बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मानसिक रूग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. जिल्ह्यात स्वतंत्र मनोविकार रूग्णालय निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या कार्यशाळेला डॉ. लता भोसले-बाहेकर, शाहिणा पठाण यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने नरेंद्र लांजेवार, दिपक चाटे, प्रदीप हिवाळे, निलकुमार बंगाळे, पंजाबराव गायकवाड, निलेश चिंचोले, प्रा. अनिल रिंढे आदींनी परिश्रम घेतले.