राजेंद्र शिंगणे बुलडाणा जिल्ह्यातील सहावे कॅबीनेट मंत्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:49 PM2019-12-31T13:49:39+5:302019-12-31T13:50:31+5:30

बुलडाणा जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात कॅबीनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे ते सहावे राजकीय व्यक्ती ठरले आहेत.

Rajendra Shingane become Sixth cabinet minister of Buldhana district! | राजेंद्र शिंगणे बुलडाणा जिल्ह्यातील सहावे कॅबीनेट मंत्री!

राजेंद्र शिंगणे बुलडाणा जिल्ह्यातील सहावे कॅबीनेट मंत्री!

googlenewsNext

- नीलेश जोशी 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर जवळपास ३४ दिवसानंतर झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात सिंदखेड राजा विधानसभा मतदारसघातून पाचव्यांदा आमदार झालेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ३० डिसेंबर रोजी मुंबईत कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात कॅबीनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे ते सहावे राजकीय व्यक्ती ठरले आहेत.
विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बुलडाणा जिल्ह्यात बऱ्यापैकी आहे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचे निकटवर्तीय तथा निष्ठावान म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे बघितल्या जाते. त्यानुषंगाने महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. शिंगणेंचा नंबर लागणार हे जवळपास निश्चित होते. त्यानुषंगाने ३० नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांनी आपली मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वीही त्यांनी राज्यमंत्री, कॅबीनेटमंत्री म्हणून जवळपास दहा वर्षे काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार हे स्पष्टच होते. दरम्यान, त्यांचा शपथविधी पाहण्यासाठी सिंदखेड राजातून मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक मतदारसंघातून मुंबईत दाखल झाले होते. आता त्यांना नेमके कोणते खाते दिल्या जाते याबाबत बुलडाणा जिल्ह्यात उत्सूकता आहे. १९९५ मध्ये अपक्ष म्हणून प्रथमत: सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. २०१४ चा अपवाद वगळता आजतागायत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. नाही म्हणायला २००९ आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा परभाव झाला होता. दोन्ही वेळी ते विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन त्यांना कॅबीनेटमंत्रीपद मिळाले आहे.


एकाच वर्षात जिल्ह्याला दोनदा कॅबीनेटमंत्रीपद
बुलडाणा जिल्ह्यास एकाच वर्षात दोनदा कॅबीनेटमंत्रीपद मिळल्याचा योगायोग २०१९ मध्ये आला आहे. जुन-जुलै दरम्यान भाजपचे आ. डॉ. संजय कुटे यांना कामगारमंत्रीपद मिळाले होते. विधानसभा निवडणुकीत डॉ. कुटे हे पुन्हा निवडून आले. पण भाजपची राज्यात सत्ता आली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतील एक महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे यांना डिसेंबर महिन्यात पुन्हा संधी मिळाली. त्यामुळे हा योगायोग साधल्या गेला आहे. मातृतिर्थाला कॅबिनेटमंत्रीपद देण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसने या निमित्ताने साधली असून सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाºया डॉ. राजेद्र शिंगणे यांनीही या निमित्ताने शपथ घेतल्यानंतर जय जिजाऊ म्हणत राष्ट्रमाता माँ जिजाऊंना अभिवादन केले. दरम्यान, जिल्ह्याला गेल्या ५९ वर्षाच्या इतिहासात उपमंत्री ते कॅबीनेटमंत्रीपद मिळालेले असून एकूण दहा जणांनी ते भुषवलेले आहे.


लोकसभेची कसरत विधानसभेत कामाला
लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी २०१९ मध्ये सिंदखेड राजा येथे खुल्या व्यायाम शाळेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी मिश्किलपणे कसरतीचे धडे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना दिले होते. त्यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी ही कसरत असल्याची कोटी झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील त्यांची ही कसरत कामात आली असून थेट कॅबिनेटमंत्रीपद त्यांच्या पदरात पडले.

Web Title: Rajendra Shingane become Sixth cabinet minister of Buldhana district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.