सर्वच पक्षांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत- राजेश टाेपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 12:47 PM2021-08-17T12:47:14+5:302021-08-17T12:47:28+5:30

Rajesh Tope : आतापर्यंत सत्तेत असलेल्या सर्वच पक्षांनी कमालीचे दुर्लक्ष केले आहे.

Rajesh Tope laments that all parties have neglected health | सर्वच पक्षांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत- राजेश टाेपे

सर्वच पक्षांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत- राजेश टाेपे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : समाजाची अत्यावश्यक गरज असलेल्या आरोग्य सेवेकडे आतापर्यंत सत्तेत असलेल्या सर्वच पक्षांनी कमालीचे दुर्लक्ष केले आहे. ही बाब कोरोना विषाणू संसर्गाने अधोरेखित केली. त्यामुळेच आतापर्यंत अर्थसंकल्पातील केवळ एक टक्का खर्च होणारा निधी पाच टक्क्यापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोग्य यंत्रणा सुदृढ केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रूग्णालयांमध्ये सीटी स्कँन, एमआरआय युनिटची सुविधा दिली जात आहे, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे ायांनी येथे सांगितले.
खामगाव शहरातील सिल्व्हरसिटी हाँस्पिटलमध्ये खामगाव सीटी स्कँन व एमआरआय रिसर्च सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार अँड. आकाश फुंडकर, माजी आमदार दिलिपकुमार सानंदा, नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्यासह चेअरमन डाँ. भगतसिंग राजपुत, डाँ. निलेश टिबडेवाल, डाँ. गणेश महाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजना सिल्व्हरसिटी रूग्णालयात सुरू व्हावी, यासाठी आपला प्रयत्न राहिल, असेही ना. टोपे यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.
पुढील काळात तालुक्याच्या ठिकाणी गरिब रूग्णांना सीटीस्कँन, एमआरआय, डायलिसिस सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. सोबतच सद्यस्थितीत राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. त्यामध्ये इसीजी तपासणी केलेल्या रूग्णावर त्याचवेळी उपचार सुरू केले जात आहेत. तसेच पुढील सेवेसाठी संदर्भ दिला जात आहे. येत्या काही दिवसात २६ जिल्ह्यांमध्येही हा उपक्रम सुरू होणार आहे, अशी माहिती ना. टोपे यांनी दिली. 

आरोग्यविम्यावर १७०० कोटींचा खर्च
विशेष म्हणजे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी विमा कंपनीला दरवर्षी १७०० कोटी रूपये दिले जातात. त्याचा विनाखर्चाचा लाभ केवळ शिधापत्रिकेवर गरिबांसह सर्वांनाच होत आहे. शासनाच्या अनेक समाजोपयोगी योजना सर्वांपर्यंत पोहचाव्या, यासाठी यंत्रणेतील संबंधितांनी दक्ष राहून त्याचा लाभ द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.


शंभर टक्के जागा भरणार
आरोग्य विभागात वाँचमनपासून सुपर स्पेशालिस्ट डाँक्टरपर्यंतची सर्व पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी भरती प्रक्रीया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. खामगाव रूग्णालयात खाटांची संख्या वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगितले.

Web Title: Rajesh Tope laments that all parties have neglected health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.