पशुपालकांचा मोर्चा; पोलिसांनी तहसीलवर येण्यापूर्वीच अडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:58 PM2019-05-08T12:58:26+5:302019-05-08T12:58:38+5:30
हा मोर्चा तहसिल कार्यालयावर येण्यापूर्वीच पोलिसांनी अडवल्याने पशुपालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
खामगाव : दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांना चारा उपलब्ध होवू शकत नाही. शिवाय पाण्याची सुविधा नाही. अशा परिस्थितीत जिल्हयात चारा छावणी सुरु कराव्यात या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यासह वाकूड परिसरातील शेतकºयांनी ८ मे रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा आणला होता. मात्र हा मोर्चा तहसिल कार्यालयावर येण्यापूर्वीच पोलिसांनी अडवल्याने पशुपालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बुधवारी सकाळी चारा छावणी साठी शेकडो जनावरासह पशुपालक तहसीलदार यांना भेटण्यासाठी जात असतांना पोलीसांनी मुंबई नागपूर महामार्गवर त्यांना रोखले. याठिकाणी पशुपालकांनी प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
सध्या अनेक शेतकºयांकडे चारा नाही. चारापाण्या अभावी जनावरांचा मृत्यू होत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात अद्याप पाऊल उचलण्यात आले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. चारा छावण्या सुरु करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पशुपालकांनी दिला आहे.