खामगावचा पाणीपुरवठा ‘रामभरोसे’!

By admin | Published: October 4, 2016 02:02 AM2016-10-04T02:02:43+5:302016-10-04T02:02:43+5:30

तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून बुस्टर हाऊस धोकादायक बनले असल्याचे वास्तव लोकमत स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आले.

Ramabhossee water supply to Khamgaon! | खामगावचा पाणीपुरवठा ‘रामभरोसे’!

खामगावचा पाणीपुरवठा ‘रामभरोसे’!

Next

अनिल गवई
खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३- शहराला पाणी वितरित करण्यात येणार्‍या बुस्टर हाऊसला अतिशय बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वारंवार येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे पालिका कर्मचारी मेटाकुटीस आले असून, उघड्यावरील मेन स्वीच (फ्यूज) आणि तत्सम यंत्रणेमुळे या ठिकाणी कोणालाही तांत्रिक सुधारणा करणे जिकरीचे झाल्याचेही लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सोमवारी उघडकीस आले.
सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराला २५ किलोमीटर अंतरावरील गेरू माटरगाव येथील धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी गेरू माटरगाव येथून जळका भंडग येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे २२ किलोमीटर अंतरावर पाइपलाइन टाकण्यात आली आहे. जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतर घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडल्या जाते. त्यानंतर वामननगर येथील बुस्टर पंप हाऊस येथून शुद्ध पाण्याचा पुरवठा संपूर्ण शहराला झोननिहाय करण्यात येतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बुस्टर हाऊसला लागलेली साडेसाती सुटता सुटत नसल्याची वस्तुस्थिती आहे. उघड्यावरील फ्यूज आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्यामुळे या ठिकाणी देखरेख करणार्‍या कर्मचार्‍याच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मात्र, याकडे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. उड्यावरील फ्यूजमुळे या ठिकाणी वारंवार शॉर्ट सर्किट होत असल्याने, शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत असून, पाणीपुरवठा सुरळीत करताना पालिका कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक होत आहे.
वारंवार अडचण निर्माण होत असल्यामुळे बुस्टर हाऊसवरून मोठय़ा प्रमाणात शुद्ध पाण्याचीही नासाडी होत आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पत्रव्यवहार करूनही काहीच उपयोग होत नसल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या असहकार्याच्या धोरणामुळे पालिका प्रशासन मेटाकुटीस आल्याचे चित्र बुस्टर हाऊसवरील परिस्थितीवरुन दिसून येते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून चालढकल सुरू असल्याने, शहरातील पाणीपुरवठा प्रभावितही होतो. रात्रीच्यावेळी बुस्टर पंपहाऊसवर दुरूस्ती करतानाही अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.

पाला-पाचोळ्यासह अशुद्ध पाण्याचा पुरवठा!

बुस्टर पंप हाऊस वरील पाणी साठविण्याच्या विहिरीवर मोठ-मोठी झाडे वाढली आहेत. त्यामुळे या झाडांचा पाला पाचोळा, घाटपुरी टाकीवरून आलेल्या शुद्ध पाण्यात पडतो. काहीच उपाययोजना नसल्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा करावा लागत असल्याचे वास्तव स्टिंग ऑपरेशनदरम्यान दिसून आले.

उघड्यावरील मेन स्वीच ठरताहेत धोकादायक !

बुस्टर पंप हाऊसवर पम्पिंग आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्टार्टर आणि मेन स्वीच बसविण्यात आले आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून मेन स्वीचमध्ये फ्यूजऐवजी तारावरच चालढकल केली जात आहे. आधीच अरूंद असलेल्या खोलीत उघड्यावरील मेन स्वीचमुळे पंप हाऊसची रखवाली करणार्‍या कर्मचार्‍याचा जीव धोक्यात आला आहे. याबाबत वारंवार महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडे तक्रार करूनही कोणताही उपयोग होत नसल्याची ओरड पालिका प्रशासनाकडून केली जात आहे.

वाढीव पाणीपुरवठा योजनेचे स्टार्टर निकामी!
बुस्टर हाऊसवर जुन्या पाणीपुरवठा योजनेसोबतच दुसर्‍या खोलीत वाढीव पाणीपुरवठा योजनेची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, वाढीव पाणीपुरवठा योजनेचे स्टार्टर काही दिवसांतच नादुरूस्त झाल्याने, बुस्टर हाऊसवरील यंत्रणेचा संपूर्ण भार जुन्याच यंत्रणेवर येऊन पडला असल्याची वस्तुस्थिती आहे.

Web Title: Ramabhossee water supply to Khamgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.