राणा चंदनच्या जाण्याने आंदोलनात्मक चळवळीत पोकळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:47+5:302021-09-18T04:37:47+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंद्रशेखर चंदन यांचे आजारपणाने ८ सप्टेंबर रोजी वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी निधन झाले. दरम्यान, ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंद्रशेखर चंदन यांचे आजारपणाने ८ सप्टेंबर रोजी वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी निधन झाले. दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रत्येकाला आपला जवळचा कार्यकर्ता गेल्याचे दु:ख झाले आणि हे दु:ख प्रत्येकाने श्रद्धांजली सभेमध्ये बोलताना व्यक्त केले. कुणाचे दवाखान्याचे काम असो, तहसीलचे असो, पोलीस स्टेशनचे असो किंवा एखाद्या महसूल कार्यालयाशी संबंधित अडचण असो, प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर एक निडर परंतु भाबडा कार्यकर्ता म्हणून राणा चंदन याचे नाव यायचे आणि राणा चंदनही त्याच्यासाठी अर्ध्या रात्री धावून यायचा.. अशा भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी जि. प. अध्यक्षा मनीषा पवार, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, बारोमासकार सदानंद देशमुख, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड व विजय अंभोरे, डॉ. गणेश गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश शेळके व संजय गाडेकर, मो. सज्जाद, शेतकरी संघटनेचे नामदेवराव जाधव, वाशिम जि. प. सदस्य दामुअण्णा इंगोले, सेवासंकल्प प्रतिष्ठानचे नंदकुमार पालवे, स्वाभिमानीचे बबनराव चेके, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रा. सुनील सपकाळ, काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस, आझाद हिंद संघटनेचे सतीशचंद्र रोेठे, स्त्री मुक्ती संघटनेच्या शाहिना पठाण, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अरुण जैन, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्ष वसीम शेख, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्दे, नामदेव डोंगरदिवे, श्रुती जोशी, गजेंद्र राजपूत, सुरेश साबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव, वैशाली ठाकरे आदींसह अनेकांनी राणांप्रती शोकसंवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह बुलडाणा शहर व परिसरातील मंडळी यावेळी आवर्जून उपस्थित होती. यामध्ये कोणत्याही पक्षाचा भेद नव्हता. यावेळी राणा चंदन यांच्या मातोश्री, धर्मपत्नी, दोन छोट्या मुली, भाऊ व पूर्ण परिवार प्रामुख्याने उपस्थित होता. सूत्रसंचालन रणजितसिंह राजपूत व राजेंद्र काळे यांनी केले. सामूहिक श्रद्धांजली अर्पित झाल्यानंतर पुन्हा चित्रफीत दाखविण्यात आली. चित्रफीत पहिल्यानंतर उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
राणाचा मोबाईल नंबर राहणार आता, स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरचा नंबर..
श्रद्धांजली सभेच्या शेवटी ऋणनिर्देश व्यक्त करताना रविकांत तुपकर यांनी, राणा चंदन यांच्या आजाराचा घटनाक्रम व केलेल्या उपचाराची इत्थंभूत माहिती दिली. चंदन यांनी आंदोलनाच्या चळवळीत केलेले कार्य सांगताना त्यांचे डोळे पाणावले. राणाचा मोबाईल नंबर हा सर्वसामान्यांच्या तोंडपाठ होता, तोच समस्या सोडवणारा नंबर आता स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरचा नंबर राहणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले.