बँकांसमोर रांगा तर एटीएम बंद
By admin | Published: November 16, 2016 08:51 PM2016-11-16T20:51:21+5:302016-11-16T20:51:21+5:30
पाचशे व १ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या आदेशाला एक आठवडा उलटत असताना अद्याप बँकांसमोरील रांगा मात्र कमी झाल्या नाहीत.
खामगाव, (जि.बुलडाणा) : पाचशे व १ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या आदेशाला एक आठवडा उलटत असताना अद्याप बँकांसमोरील रांगा मात्र कमी झाल्या नाहीत. उलट नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत असताना शहरातील विविध बँकांचे एटीएम मात्र अशाही परिस्थितीत बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास वाढला आहे. तर ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी स्वतंत्र रांगेची घोषणा होत असताना शहरात मात्र ज्येष्ठ नागरिकांनाही ही सुविधा उपलब्ध नाही.
गत मंगळवारी ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा अनपेक्षित निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी यांनी जाहीर केला. या निर्णयानंतर बुधवारी बँका बंद होत्या. तर दोन दिवस एटीएम बंद होते. ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद झाल्याने सामान्य नागरिकांना गरजेच्या वस्तू खरेदीसाठी त्रास सहन करावा लागला. कधीची उधारी न ठेवलेल्यांनाही लाजतकाजत जीवनावश्यक वस्तुंची खरेदी उधारीत करावी लागली. हा त्रास पाहता तसेच सोमवारची बँकांना सुटी असल्याने रविवारी बँका सुरु होत्या. मात्र आठ दिवस उलटत असतानाही शहरातील बँकासमोरील रांगा कमी होण्याऐवजी वाढत्याच आहेत. अशा वेळी जादाची उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र उलट शहरातील विविध बँकांचे एटीएम बंद आहेत. बुधवारी शहरातील रेल्वे स्टेशनजीकचे आयसीआयसीआय बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, बालाजी प्लॉट भागातील अक्सीस बँक, बॅक आॅफ इंडिया, नॅशनल हायस्कूलसमोरील आयडीबीआय बँक, आईसाहेब मंगल कार्यालयातील बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक समोरील एचडीएफसी बँक असे एटीएम बंद होते. एकूणच बँकातील व्यवहार वाढले असताना नोटा बदलण्यासाठी अतिरिक्त सुविधा निर्माण करण्याची गरज असताना एटीएम मात्र बंद राहत असल्याने तसेच बँकामधील रांगा कमी होत नसल्याने खातेदार त्रस्त झाले आहेत.
सर्वच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोटा बदलून मिळाव्या
शहरातील मोजक्याच बँकांमध्ये नोटा बदलून मिळत आहेत. त्यामुळे या बँकांच्या कामकाजावर ताण निर्माण झाला आहे. मात्र अनेक बँकांमध्ये नोटा बदलून मिळत नाहीत. सर्वच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोटा बदलून देण्याची सुविधा निर्माण झाल्यास नागरिकांना सोयीचे होईल सोबतच बँकाचेही कामकाज सुरळीत होवू शकेल. शहरातील अनेक राष्ट्रीयकृत बँका आपल्या खातेदारांनाच ही सुविधा पुरवित आहे. खात्यात बंद झालेल्या नोटा जमा केल्यानंतर विड्रॉल देण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिक व अपंगासाठी सुविधा नाही
ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी स्वतंत्र रांगेची घोषणा होत असताना शहरात मात्र ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी स्वतंत्र रांग नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. ही सुविधा शहरात सुरु करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून केल्या जात आहे. रांगेत उभे राहून अनेकांना चक्कर येणे असा त्रास होत आहे. तेव्हा जेष्ठ नागरिकांसाठी वेगळे काऊंटर सुरु करण्याची मागणी केल्या जात आहे.