चिखलीत प्रवेशासाठी रॅपिड टेस्ट बंधनकारक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:35+5:302021-08-12T04:39:35+5:30
चिखली : जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच चिखली तालुक्यात ९ ऑगस्ट रोजी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर ...
चिखली : जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच चिखली तालुक्यात ९ ऑगस्ट रोजी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३.५१ टक्के झाला असल्याने कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये, यासाठी तालुका प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याअंतर्गत चिखली शहरात प्रवेशासाठी १० ऑगस्टपासून ‘रॅपिड अँटिजन’ तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.
चिखली शहर व ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याने तालुका प्रशासनाने नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे, तसेच कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना कटाक्षाने पाळण्याबाबत आवाहन केले आहे. दरम्यान सर्दी, ताप, खोकल्याच्या संशयित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, फेरीवाले, हातगाडीवरील व्यावसायिक, बाजारातील दुकानदार, फळविक्रेते यांनी स्वयंस्फूर्तीने कोविड तपासणी करून घ्यावी, तसेच १० ऑगस्टपासून शहरात प्रवेश करण्यासाठी कोविड रॅपिड अँटिजन तपासणी अनिवार्य करण्यात आली असल्याने तपासणी सोयीची होण्यासाठी सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड व मोबाइल नंबर सोबत बाळगावा, असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार अजितकुमार येळे, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खान, ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी केले आहे.