उजव्या बाजूने हृदय असलेला दुर्मीळ व्यक्ती
By Admin | Published: June 4, 2017 05:20 AM2017-06-04T05:20:05+5:302017-06-04T05:20:05+5:30
वैद्यकीय तपासण्यांमध्ये त्याचे हृदय चक्क उजव्या बाजूला असल्याचे आढळून आल्यानंतर डॉक्टरही चक्रावून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : मनुष्याचे हृदय छातीत डाव्या बाजूला असते, हे सर्वश्रुत आहे; परंतु लाखात एखाद्याचे हृदय उजव्या बाजूने असू शकते, असाच एक दुर्मीळ व्यक्ती खामगावनजीकच्या घाटपुरी गावात आढळून आला आहे.
अरुण श्यामराव तायडे वय ४२, रा. घाटपुरी ता.खामगाव असे या व्यक्तीचे नाव आहे. वैद्यकीय तपासण्यांमध्ये त्याचे हृदय चक्क उजव्या बाजूला असल्याचे आढळून आल्यानंतर डॉक्टरही चक्रावून गेले. हृदय उजव्या बाजूने असले तरी सर्व शारीरिक क्रिया या डाव्या बाजूने हृदय असणाऱ्यांप्रमाणे सुरळीत असतात, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. शहरातील एका लॉटरी सेंटरवर काम करणारे अरुण तायडे यांच्या छातीत दुखत असल्यामुळे ते काही दिवसांपूर्वी शहरातील नामांकीत डॉ. सुरेंद्र जैन यांच्याकडे गेले. यावेळी डॉ.जैन यांंनी त्यांची तपासणी केली असता, हृदय उजव्या बाजूने असल्याचे आढळले. छातीत दुखत असल्यामुळे डॉ.जैन यांनी तायडे यांना एन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यावर तायडे यांनी अहमदनगर येथील आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये जावून तपासणी केली. यामध्येसुद्धा तायडे यांचे हृदय उजव्या बाजूने असल्याचे; पण सुरळीतपणे काम करीत असल्याचे आढळून आले., तर असे उदाहरण लाखात एखादेच असून, हे फक्त वेगळेपण आहे. त्याचा कोणताही विपरित परिणाम होत नाही.