काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ८४ कट्टे तांदूळ पकडला!
By Admin | Published: July 15, 2017 12:38 AM2017-07-15T00:38:44+5:302017-07-15T00:38:44+5:30
मलकापूर पांग्रा : किनगाव राजा पोलिसांनी नाकेबंदी करून सदर काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ८४ कट्टे तांदळाचा माल १३ जुलैच्या रात्री पकडला व आरोपीस मुद्देमालासह अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर पांग्रा : सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा गोदामावरून रेशनचा माल ४०७ वाहनात भरुन जालनाकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन किनगाव राजा पोलिसांनी नाकेबंदी करून सदर काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ८४ कट्टे तांदळाचा माल १३ जुलैच्या रात्री पकडला व आरोपीस मुद्देमालासह अटक केली आहे.
साखरखेर्डा येथील रेशन गोदामावरून अवैधरीत्या तांदळाचे ८४ कट्टे मेटाडोरमध्ये भरून काळ्या बाजारात जात असल्याची माहिती एसडीपीओ वैंजने यांना मिळाली. त्यावरुन वैंजने यांनी किनगाव राजा पोस्टेचे ठाणेदार वानखेडे यांना नाकाबंदी करुन हे वाहन पकडण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, ठाणेदार वानखेडे यांनी तत्काळ मलकापूर पांग्रा-दुसरबीड नाक्यावर नाकाबंदी करून किनगाव राजा बसस्थानकावर टाटा ४०७ क्र.०६-५५३ या वाहनास हात दाखवून चौकशी केली. तेव्हा या वाहनामध्ये रेशनच्या तांदळाचे ८४ कट्टे आढळून आले. वाहन चालक दत्ता काशिनाथ देवकर (४०) रा.साखरखेर्डा याला वाहतूक परवाना विचारला असता, त्याची तारांबळ उडाली. त्यावरुन शासकीय वितरण प्रणालीमध्ये वितरित होणारा तांदूळ काळ्या बाजारात जास्त भावाने विक्री करण्यासाठी जात असल्याचे यावरुन समोर आले. अवैधरीत्या ‘गर्व्हमेंट आॅफ हरियाणा’ असा शिक्का असलेले तांदळाचे ८४ कट्टे प्रत्येकी वजन ५० किलो एकूण ४२ क्विंटल तांदूळ अंदाजे ८४००० रुपये किमतीचा ऐवज व एक मोबाइल किंमत १००० रुपये व मेटाडोअर किमंत २ लाख रुपये, असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी वाहनचालक दत्ता काशिनाथ देवकर व सोबत असलेला दीपक विष्णू गवळी (वय २८) दोन्ही राहणार साखरखेर्डा यांच्याविरुद्ध पोलिसांनी अप क्र. १५८/१७, जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास ठाणेदार सचिन शिंदे करीत आहेत.
रेशन दुकानदार व संबंधित अधिकाऱ्यांचे संगनमत
सदर प्रकार द्वारपोच योजनेच्या माध्यमातून होत असल्याची चर्चा आहे. अन्न पुरवठा वितरण विभाग, रेशन दुकानदार व संबंधित अधिकारी यांचे संगनमत असल्याने गोरगरिबांना मिळणारा लाभ कमी करून तोच माल अवैधरीत्या काळ्या बाजारात विकून ती रक्कम अधिकाऱ्यांसह माफियाच्या घरात जात आहे. सिंदखेडराजा तालुक्यात रेशन शासकीय नियमानुसार न देता जादा भावात देत असल्याच्या तक्रारी होत असून, अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत, हे या धाडीवरुन समोर आले आहे.
५ जुलैनंतर ज्या रेशन दुकानदारांनी साखरखेर्डा येथील गोदामातून धान्य वितरित करण्यासाठी आणले आहे, अशा सर्व दुकानदारांची चौकशी करण्यात येईल. आम्ही या प्रकणाची सखोल चौकशी करण्यासाठी निरीक्षक सुनील धोंडकर व नायब तहसीलदार एच.डी. वीर यांचे दोन सदस्यीय पथक बनविले असून, ज्या दुकानदाराच्या रेकॉर्डमध्ये अफरातफर असेल, अशा दुकानदारांवर योग्य कार्यवाही केली जाईल.
- संतोष कनसे, तहसीलदार, सिंदखेड राजा.