समता परिषदेचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:24 AM2021-06-25T04:24:47+5:302021-06-25T04:24:47+5:30
बुलडाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित कार्यवाही करावी यासाठी अखिल ...
बुलडाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित कार्यवाही करावी यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने त्रिशरण चौक बुलडाणा येथे रास्ता रोको आंदोलन जिल्हाध्यक्ष दत्ता खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
रास्ता रोको आंदोलनादरम्यान आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, ऊठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो, या व अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले़
सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटीशनमध्ये दिलेल्या निकालामुळे पंचायत राज संस्थांमधील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. याचा फार मोठा परिणाम होत आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ओबीसींमध्ये असंतोष पसरला आहे. मंडळ आयोग व ७३ आणि ७४ व्या घटना दुरुस्तीने ओबीसींना विविध पातळ्यांवर आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण कायदेशीर असून त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे. ओबीसी प्रवर्गातील वंचित जनसमूहांना लोकशाही प्रक्रियेत पंचायत राज संस्थामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने त्वरित उचित कार्यवाही करून ओबीसींच्या हक्काचे २७ टक्के आरक्षणाचे रक्षण करावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे़
निवेदनावर दत्ता खरात, सदानंद माळी, ॲड. जयश्री शेळके, ॲड. ज्योती ढोकणे, अनंता लहासे, श्लोकानंद डांगे, नीलेश तायडे, आशिष लहासे, रवी आप्पा तोडकर, संतोष लोखंडे, श्रीकांत जाधव, विठ्ठल जाधव, संतोष काळे, त्रंबक भराड, वैभव लाड, सय्यद अन्सार, गणेश मोहिते, रितेश चौधरी, अनिल कोळसे, गणेश बोचरे, सुरेश जाधव, विजय खरात, गणेश भराड, गजानन बोऱ्हाडे, प्रकाश निकम, तोलाजी जाधव, ओम मगर, राजेश मोहाळे, शंकर गिऱ्हे, संजय चौगुले, दत्ता निकम, शुभम मोहाळे, फकिरा भराड, गजानन सोनवणे, दीपक मगर, गजानन वानखेडे, अमोल निकम, विजय डोईफोडे, मनोज पवार, विशाल वाघ, प्रवीण वाघ, योगेश रोजे आदींच्या स्वाक्षरी आहेत.