साडेपाच लाख शीधापत्रिका धारकांची दीपावली पुरणपोळी विणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 03:55 PM2018-11-02T15:55:17+5:302018-11-02T15:55:32+5:30
खामगाव : मागणी पेक्षा पुरवठा कमी असल्याने, जिल्ह्यातील साडेपाच लाखावर शीधापत्रिका धारकांची दीपावली पुरणपोळी विणाच साजरी होणार दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : मागणी पेक्षा पुरवठा कमी असल्याने, जिल्ह्यातील साडेपाच लाखावर शीधापत्रिका धारकांची दीपावली पुरणपोळी विणाच साजरी होणार दिसून येते. दाळीचा अत्यल्प तर साखरेचा साठाच उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार मेटाकुटीस आले असून, दीपावलीपूर्वी सर्वांना दाळीचे वितरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेत विरणार असल्याचे दिसून येते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे दीपावली निमित्त स्वस्त धान्य दुकानातून उडीद आणि हरभरा दाळ देण्याचे जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही दीपावलीपूर्वी दाळीचे वितरण करण्याची घोषणा केली. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी मागणीपेक्षा कमी दाळीचा साठा पाठविण्यात आला. तर साखरेचा साठाच शिल्लक नाही. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांसमोर धान्य वितरीत करावे तरी कसे? असा पेच निर्माण झाला आहे. स्वस्त धान्य दुकानातून १ किलो चना दाळ आणि १ किलो उडीददाळ वितरीत करण्याचे नियोजन आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच लक्ष ५४ हजार ४४५ शीधा पत्रिकांधारकांसाठी ७२५ मेट्रीक टन दाळींची आवश्यकता आहे. मात्र, शीधापत्रिका धारकांच्या तुलनेत २९५ मेट्रीक टन दाळीच उपलब्ध झाल्याने, अनेक स्वस्त धान्य दुकानदारांचे वाटप रखडले आहे.
साखरेच्या नियतनाचा तांत्रिक पेच!
बुलडाणा जिल्ह्यासाठी साखरेची उचल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. मात्र, साखरेच्या साठ्याची वाहतूक करण्याचे आदेश काढण्यासंदर्भात बुलडाणा जिल्हा पुरवठा विभागाकडून कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील साखर नियतनाचा तांत्रिक पेच निर्माण झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सहा. पुरवठा अधिकाºयांमध्ये सुंदोपसुंदी रंगल्याचीही चर्चा पुरवठा विभागात आहे.
संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती उद्भवली असून बुलडाणा जिल्ह्यातही मागणीपेक्षा कमी धान्य साठा प्राप्त झाला आहे. शनिवारपर्यंत धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न आहेत. दीपावलीपूर्वी धान्य साठा सुरळीत करण्याचे प्रयत्न आहेत.
- बी.यू.काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.
दाळ आणि साखरेचा साठा उपलब्ध नसल्याने रेशन दुकानदारांना ऐन दीपावलीसारख्या सणाच्या दिवसांमध्ये नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दाळीसाठी चालानचा भरणा केल्यानंतर ही मागणीच्या प्रमाणात दाळी उपलब्ध होत नाहीत. जिल्ह्यात साखर कुठेच उपलब्ध नाही.
- राजेश अंबुस्कर, जिल्हाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वातमोठ्या खामगाव तालुक्यातही दाळी आणि साखर उपलब्ध नाही. वारंवार तक्रारी केल्यानंतरही धान्य उपलब्ध होत नसल्याने, स्वस्त धान्य दुकानदार त्रस्त झालेत. दीपावलीपूर्वी डाळी आणि साखर उपलब्ध करून दिली जावी.
- रवि महाले, तालुकाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, खामगाव.