तांदूळ खरेदीसाठी रेशन माफिया सक्रीय; ऑटोतून साठवणुकीच्या ठिकाणी वाहतूक
By अनिल गवई | Published: September 14, 2022 12:32 PM2022-09-14T12:32:57+5:302022-09-14T12:34:11+5:30
विविध ठिकाणी माल पोहोचविण्यासाठी चक्क ऑटोचा वापर केल्या जात आहे. या धक्कादायक प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
खामगाव: विविध शासकीय योजनांमार्फत लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांतून वितरीत करण्यात येणाऱ्या तांदळासह धान्याची खुल्या बाजारात विक्री केली जात आहे. यासाठी काही व्यावसायिकांनी तालुक्यात सर्वदूर जाळे विणले असून, महिन्याकाठी ४० ते ४५ हजार क्विंटल धान्याची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक आणि वाहतूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विविध ठिकाणी माल पोहोचविण्यासाठी चक्क ऑटोचा वापर केल्या जात आहे. या धक्कादायक प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
रेशन धान्याची खरेदी करणारे एक मोठे रॅकेट बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील सहा तालुक्यात सक्रीय आहे. यामध्ये खामगाव, मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात बडे रेशन माफीयांनी जाळे विणले आहे. शेगाव तालुक्यात टाकळी विरो आणि शिवारात चार व्यावसायिक या व्यवसायात गुंतले आहेत. त्याचवेळी शेगाव तालुक्यातील खरेदी केलेल्या मालाची बाळापूर आणि अकोला येथे विक्री होते. तर नांदुरा येथील तीन व्यावसायिक आणि खामगावातील दोन व्यावसायिकांचे मध्यप्रदेशात ‘कनेक्शन’ आहे.
मलकापूर येथील तिन व्यापारी आणि संग्रामपूर व जळगाव येथील प्रत्येकी एक व्यापारी मध्यप्रदेशातच रेशनचा खरेदी केलेला माल पाठवित असल्याची चर्चा आहे. सणासुदीच्या दिवसांत मोठ्याप्रमाणात धान्य विक्री होत असली तरी, पुरवठा विभागाकडून कारवाईकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. घाटाखालील सहा तालुके आणि घाटावरील मोताळा तालुक्यात महिन्याकाठी तब्बल ५० हजार पेक्षा अधिक क्विंटल तादूंळ खुल्या बाजारात विकला जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.
येथे आहेत तालुकानिहाय साठवणूक केंद्र !
खामगाव: गणेशपूर, तरोडा डी, माक्ता कोक्ता, पिंपळगाव राजा, काळेगाव, रोहणा.
नांदुरा: तरवाडी, आमसरी, ज्ञानगंगापूर, खैरा, शेंबा, वडनेर भोलजी, चांदुरबिस्वा.
संग्रामपूर : बोडखा, सोनाळा, वरवट बकाल, पळशी झांशी, बावनबीर.
जळगाव जामोद: कुरणगाड, खेर्डा.
शेगाव: टाकळी विरो, नागझरी, लासूरा, जलंब, पहुरजीरा, भोनगाव, मनसगाव.
मलकापूर: उमाळी, नरवेल, धरणगाव, देवधाबा.
धान्यखरेदीसाठी लहान मोठ्या वाहनांचे जाळे!
- रेशन लाभार्थ्यांकडून धान्य खरेदीसाठी मार्गनिहाय एक मोठे वाहन या व्यापाऱ्याकडून तैनात करण्यात आले आहे. गावोगावी आणि अंतर्गत रस्त्यावर फिरून धान्य गोळा करण्यासाठी आॅटो तसेच लहान वाहनांचा वापर केल्या जात आहे. काही दुचाकी स्वारही रस्ता क्लिअर करण्यासाठी या वाहनांच्या पाठीमागे राहतात.
रेशनच्या तांदळाप्रकरणी खामगाव आणि शेगाव परिसरात यापूर्वीच १४ गुन्हे दाखल केले आहेत. रेशनमालाच्या खुल्या बाजारातील विक्रीला पायबंद घालण्यासाठी परिसरातील पोलीस पाटील यांना पत्र दिले आहे. तरी देखील रेशन मालाची विक्री होत असल्यास संबंधितांविरोधात पोलीस तक्रार दिली जाईल.
- व्ही.एम. भगत
तालुका पुरवठा अधिकारी, खामगाव.