रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
By ब्रह्मानंद जाधव | Published: February 11, 2023 04:25 PM2023-02-11T16:25:13+5:302023-02-11T16:25:57+5:30
कापूस, सोयाबीन दरवाढीचे आंदोलन पेटले
ब्रह्मानंद जाधव, बुलढाणा: कापूस व सोयाबीनच्या दरवाढीसह पीकविमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तुपकर यांना वेळीच रोखण्यात आले. दरम्यान, कार्यकर्त्यांवर लाठीमारही करण्यात आला.
कापूस व सोयाबीनच्या दरवाढीसह पीकविमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केली होती. मागणीपूर्ण न झाल्यास ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुंबईत शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज सकाळपासून शहरात बंदोबस्त लावला होता. दोन दिवसांपूर्वीच रविकांत तुपकर यांना या आंदोलन प्रकरणी कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होणारा प्रश्न पाहता पोलिसांनी नोटीसही बजावली होती. परंतू ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत तुपकर यांनी अंगावर डीझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच तुपकर यांना रोखले. तुपकर यांना ताब्यात घेऊन बाजार समितीच्या भवनमध्ये ठेवण्यात आले आहे.
कार्यकर्त्यांवर लाठीमार, वातावरण चिघळले!
रविकांत तुपकर यांची प्रशासनासोबत बराच वेळ चर्चाही चालली. आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे तुपकर यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हाधीकारी कार्यालय परिसरातील जमावावर पोलीसांनी लाठीमारही केला. त्यामुळे वातावरण चिघळले होते.