बुलडाण्यात उष्माघात कक्ष कुलुप बंद! ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान समोर आले वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 07:27 PM2019-04-25T19:27:10+5:302019-04-25T19:27:43+5:30
२५ एप्रिल रोजी तर बुलडाण्यातील तापमान ४२.५ अंश सेल्सीअसपर्यंत गेलेले असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयातील उष्माघात कक्ष कुलुप बंद दिसून आले.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा - विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असताना बुलडाण्यातही उन्हाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, २५ एप्रिल रोजी तर बुलडाण्यातील तापमान ४२.५ अंश सेल्सीअसपर्यंत गेलेले असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयातील उष्माघात कक्ष कुलुप बंद दिसून आले. उष्माघाताचा रुग्ण आल्यास या कक्षामध्ये सुविधांचाही अभाव असल्याचे वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनदरम्यान गुरूवारी समोर आले आहे.
विदर्भात २३ ते २९ एप्रिल या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यम ते उष्ण लहरी प्रवाहीत होत आहेत. परिणामी, बुलडाणा जिल्ह्याला लागून असलेल्या अकोल्याचेही तापमान ४६ अंशावर गेल्याने पूर्व विदर्भातील उष्णतेची लाट हळुहळु पश्चिम विदर्भातही शिरली आहे. हवामान शास्त्रानुसार उष्णतेच्या लाटेमध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश नसला तरी शेजारील जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यानंतर थोडाफार फटका जिल्ह्यातही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या उष्णतेच्या पृष्टभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील उष्माघात कक्षाची पाहणी व चौकशी केली असता उष्माघात कक्षाला कुलुप लावलेले दिसून आले. तर उष्माघात कक्षासाठी अंतर्गत सुविधांचाही अभाव आहे. गुरूवारी बुलडाण्याचे तापमान ४२.५ अंशावर पोहचले असतानाही दुपारच्यावेळेस उष्माघात कक्ष बंद असल्याने आरोग्य विभाग किती जागृक आहे, याचे वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आपरेशनमुळे समोर आले आहे.
असे झाले स्टिंग
‘लोकमत’ प्रतिनिधी गुरूवारी दुपारी १२.३० वाजतादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले असता उष्माघात कक्षाची विचार केली. दोन ते तीन कर्मचाºयांना विचारणा केल्यानंतर एकाने उष्माघात कक्ष कुठे आहे, ते सांगितले. परंतू उष्माघात कक्षाला कुलुप लावलेले दिसून आले. उष्माघात कक्षाच्या बाहेर उष्माघाताची चिन्ह, लक्षणे व उपचार लावलेले आढळून आले. मात्र आजुबाजुला एकही कर्मचारी त्याठिकाणी हजर दिसून आले नाही. तर दरवाजाच्या काचातून पाहिले असता कक्षात केवळ खाटांव्यतिरिक्त कुठल्याच सोयी-सुविधा दिसल्या नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयात वाढले रुग्ण
‘एप्रिल हीट’ने वाढले रुग्ण
विदर्भातील एप्रिल व मे महिन्याचा उन्हाळा तसा सर्वत्र प्रसिद्ध आहे. सध्या एप्रिल हीटने रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे चित्र जिल्हा सामान्य रुग्णालयात दिसून येत आहे. सूर्य आग ओकत असताना जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांचाही आकडा फुगतच आहे. गुरूवारला जिल्हा समान्य रुग्णालय रुग्णांनी खचाखच भरलेले दिसून आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना केलेली आहे. सध्या रुग्ण नसल्याने ते बंद आहे. उष्माघात कक्षात लागणाºया आवश्यक त्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत.
- डॉ. पी. बी. पंडित,
जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.