लागवडीसोबतच संगोपन आवश्यक!
By Admin | Published: June 30, 2016 01:00 AM2016-06-30T01:00:24+5:302016-06-30T01:00:24+5:30
लोकमत परिचर्चेतील सूर: वृक्ष संगोपनाची सामूहिक जबाबदारी घेणे आवश्यक.
बुलडाणा : शासनाच्यावतीने यावर्षी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या वृक्ष लागवडीच्या चळवळीत शासकीय कर्मचार्यांसह विविध संस्था, संघटना तसेच पर्यावरणप्रेमी मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत; मात्र दरवर्षी मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे वृक्ष लागवडीनंतर वृक्ष संगोपनावर भर देण्याची गरज असल्याचे मत ह्यवृक्ष लागवड ठरतोय फार्स?ह्णया विषयावर लोकमततर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या परिचर्चेत उमटला. पावसाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र अल्हाददायक वातावरण आहे. या दिवसात वृक्ष लागवड केल्यास अनेक रोपे जिवंत ठेवण्यास मदत होते. पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून, शासनाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १ जुलै रोजी दोन लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे; मात्र दरवर्षी वृक्ष लागवड झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. या चळवळीकडे शासकीय कर्मचार्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतो; मात्र शासकीय कर्मचारी या चळवळीत सहभागी होत असून, पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेत असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे काहींनी सांगितले, तर काही पर्यावरण प्रेमींनी वृक्ष लागवड केल्यानंतर वृक्ष संगोपनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. काहींनी वृक्ष संगोपनात सातत्य हवे, त्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत वेग येईल. यासाठी वृक्ष संगोपनाची सामूहिक जबाबदारी घेऊन वृक्ष संगोपनावर भर देण्याची गरज असल्याचे काहींनी सांगितले.