८२८१ विद्यार्थ्यांसाठी ३३.१२ लाख रुपये प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:53 AM2017-07-21T00:53:11+5:302017-07-21T00:53:11+5:30
गणवेश अनुदान योजनेंतर्गत सर्वप्रथम शेगावला निधी प्राप्त
गजानन कलोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : तालुक्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत गणवेश अनुदानपोटी जिल्ह्यात सर्वात प्रथम शेगाव पंचायत समितीद्वारा ८२८१ विद्यार्थ्यांसाठी प्रतिगणवेश २०० रुपयेप्रमाणे प्रत्येकी दोन गणवेशांकरिता ४०० रुपयेप्रमाणे ३३१२४०० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मुख्याध्यापक यांच्या मागणीनुसार शाळांच्या खात्यात १९ जुलै रोजी ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
सर्व शिक्षा अभियान गणवेश योजना सन २०१७-१८ च्या आर्थिक वर्षात इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रतिलाभार्थी २०० रुपयेप्रमाणे दोन गणवेशांकरिता ४०० रुपयेप्रमाणे ८२८१ लाभार्थींसाठी रुपये ३३१२४०० अनुदान प्राप्त झाले आहे. जि.प. व न.प. शाळांच्या मुख्याध्यापक यांनी केलेल्या मागणीनुसार शाळांच्या खात्यात ही रक्कम १९ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्यात सर्वप्रथम शेगाव येथे जमा करण्यात आली आहे.
शेगाव तालुक्यात जि.प. व न.प. शाळांमधील ७७१७ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र लाभार्थी असून, त्यामध्ये सर्व मुली ५१२१, एसटी मुले १६१९, एसटी-मुले १६८ तसेच सर्व प्रवर्गातील बीपीएल मुले ८०९ अशा सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी दोन गणवेशांकरिता ४०० रुपये रक्कम देण्याच्या या योजनेनुसार लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
डीबीटी योजनेनुसार विविध कल्याणकारी योजनेंतर्गत मिळणारे अनुदान प्रत्यक्ष लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत शून्य बॅलेन्सवर खाते उघडण्याबाबत शासनाचे आदेश आहेत; परंतु तालुक्यातील सर्वच बँका शून्य बॅलेन्सवर खाते उघडण्याच्या कामात टाळाटाळ व दिरंगाई करीत असल्याबाबत पालक व मुख्याध्यापक यांच्या लेखी व तोंडी तक्रारी होत आहेत. यासंदर्भात तालुक्यातील सर्व बँकांना लाभार्थी विद्यार्थ्याचे शून्य बॅलेन्सवर खाते काढण्यासाठी सहकार्य करण्याबाबत लेखी पत्रसुद्धा बँकांना पं.स.द्वारा दिले आहेत.
तरीसद्धा बँका खाते काढण्यास विलंब करीत आहेत. बँक खात्याअभावी मुख्याध्यापकांना गणवेशाची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यास अडचणी येत आहेत. मुख्याध्यापकांनी लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेऊन दोन गणवेश खरेदी केल्याची पावती मुख्याध्यापकांना सादर केल्यानंतरच शाळेचे मुख्याध्यापक लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाची ४०० रु. रक्कम जमा करतील, अशा सूचना आहेत. एकीकडे बुलडाणा जिल्ह्यात सर्वप्रथम शेगाव तालुक्यातील गणवेशाचे अनुदान शाळांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. दुसरीकडे बँकेत खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे अनुदान मिळण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे.
अशी आहे लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या
तालुक्यात एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ८२८१ आहे. यामध्ये सर्व मुली ५५५३, अनु.जाती मुले १६१९, अनु. जमाती मुले १६८, दारिद्र्यरेषेखालील मुले ९४१, असे एकूण ८२८१ विद्यार्थी असून, त्यांना प्रत्येकी ४०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. याकरिता ३३१२४०० रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. हा निधी मुख्याध्यापक व शाळा शिक्षण समितीच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर तो विद्यार्थ्यांच्या खात्यात वळविला जाईल.