यंदाच्या निचांकी तापमानाची बुलडाण्यात नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 01:00 PM2019-12-28T13:00:34+5:302019-12-28T13:00:46+5:30
थंड हवेचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहरात यंदाच्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून जिल्ह्याचे किमान तापमान हे १२.५ अंश सेल्सिअसवर सध्या स्थिरावले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: थंड हवेचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहरात यंदाच्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून जिल्ह्याचे किमान तापमान हे १२.५ अंश सेल्सिअसवर सध्या स्थिरावले आहे.
वातावरणातील अनाकलीनय बदलाची यावर्षी बुलडाणेकरांना जाणीव होत असून १७ डिसेंबर व २६ डिसेंबर रोजी बुलडाणा शहर परिसरासह अगदी मोताळा तालुक्यातील काही भागात बाष्पयुक्त धुक्याची चादर पसरली होती तर शुक्रवारी बुलडाणा शहराचे सकाळी साडेआठ वाजता घेतलेले किमाना तापमान हे १२.५ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. त्यामुळे बुलडाणेकरांना सध्या हुडहुडी भरली असून पहाटे धुक्याची चादर बुलडाणा शहरावर पसरलेली दिसत असून सायंकाळदरम्यानही ती दिसत आहे. दरम्यान २८ डिसेंबर रोजीही बुलडाणा शहराचे किमान तापमान हे दहा अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्ता हवामान खात्याच्या असलेल्या काही वेबसाईटवर दाखविण्यात येत आहे. गुरूवारीच याबाबत संकेत देण्यात आले होते. त्यानुषंगाने शुक्रवारी बुलडाण्याचे तापमान हे १२.५ अंश सेल्सिअर होते. १७ डिसेंबर रोजी बुलडाण्याचे तापमान हे १५.४ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर तापमापीचा पारा आणखी खाली घसरला आहे. दरम्यान, आता हिवाळा लागल्याची लक्षणे प्रत्यक्ष दिसू लागली आहे.
कोल्ड क्रॉप्टसाठी उपयुक्त
सध्या पडणारी ही थंडी कोल्ड क्रॉप्टसाठी उपयुक्त आहे. याचा फायदा हा गहू, हरभऱ्यासह अन्य पिकांना होणार आहे. वाढत्या थंडीचा फायदा हा या दोन्ही पिकांच्या उत्पादन वाढीसाठी होऊ शकतो, असे कृषी विभागातील सुत्रांनी सांगितले. दरम्यान, अवकाळी पावसामुळे जमिनीमध्ये अद्यापही ओल असल्याने थंडीचा जोर येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.