शेगावातही पठाणी वसुली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:30 AM2017-09-30T00:30:28+5:302017-09-30T00:30:44+5:30
शेगाव: व्याजाची रक्कम अदा केल्यानंतरही रक्कम वसुलीसाठी सुरू असलेल्या सावकाराच्या जाचाला कंटाळून वाडी (खामगाव) येथील एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. या घटनेनंतर शेगाव शहरातीलही अनेक जण खामगावच्या दोघा-तिघा अवैध सावकारांच्या पाशात अडकलेले असल्याने येथेही या घटनेची पुनरावृत्ती होण्याचे चिन्हे दिसून येत आहे.
फहीम देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा जिल्ह्यात अवैध सावकारी पीक सध्या जोरात आहे. व्याजावर व्याज, चक्री व्याज, सवाई व्याज, दिडी व्याज आणि सध्या बाजारात सुरू आहे तो दैनंदिन व्याज. यातूनच वाडी (खामगाव) येथील एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला तर यात एकाचा बळीसुद्धा गेला आहे. या प्रकारा पेक्षाही मोठे प्रकार सध्या शेगावात सुरू आहे.
खामगावच्या दोन ते तीन अवैध सावकारांनी शेगावात मागील तीन- चार वर्षांपासून आपले बस्तान मांडले आहे. या काळात शेगावात किमान १00 जण या सावकारांच्या पाशात अडकले आहेत. विशेष म्हणजे या सावकारांनी जे काही व्यवहार केले ते सर्व दैनंदिन व्याजाच्या नावाखाली केले असल्याने सावकाराला कितीही रक्कम दिली तरी कर्ज फिटविल्या जात नाही. यातून अनेक वेळा या सावकारांनी शेगावात येऊन कर्जदारांना मारहाणसुद्धा केली आहे. दैनंदिन व्याजमध्ये दिलेली रक्कम ही एका महिन्यात दुपटीपेक्षाही जास्त होते. घेताना कर्जदार आ पल्या अंगावर आलेले काम करून घेण्यासाठी पैसे उचलतो; मात्र ती रक्कम फिटत नसल्याने कर्जदार आत्महत्येसारखे पर्याय निवडतात.
विशेष म्हणजे शेगावातीलही अवैध सावकारांच्या पाशात अडकलेल्या मंडळींमध्ये जास्त भरणा हा युवा वर्गाचा आहे. शेगावात या सावकारांचे काही हस्तक सक्रिय असून, त्यांना या व्याजातून कमिशन दिल्या जाते. त्यामुळे हे हस्तक वसुलीसाठी तगादा लावतात. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात अवैध सावकाराने एकाला जबर मारहाणसुद्धा केली होती. खामगावच्या घटनेची पुनरावृत्ती शेगावात होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच दाखल घेणे गरजेचे आहे. अव्वाच्या सव्वा भावाने पैसे व्याजाने देऊन त्याची जबरदस्तीने वसुली करणार्या सावकारांवर पोलिसांनी नजर ठेवण्याची गरज असून, सावकारी पाशात अडकलेल्यांना दिलासा मिळवून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.