पाण्याचा पुनर्वापर; बचतीची आवश्यकता
By admin | Published: July 14, 2014 11:02 PM2014-07-14T23:02:08+5:302014-07-14T23:02:08+5:30
लोकमत इनिशिएटिव्ह; थेंब महत्त्वाचा उज्ज्वल भविष्यासाठी
बुलडाणा : एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या बुलडाण्यावर चार दिवसाआड पाणी पुरवठय़ाची नामुष्की ओढवली आहे. धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय आता सोडण्याची गरज आहे. बुलडाण्यातील काही वार्डातील नागरिकांनी पाण्याच्या बचतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे, यातून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढे येण्याची हीच वेळ आहे. पाण्याच्या पुनर्वापराचा प्रयत्न केला तर एक सुजाण नागरिक म्हणून राष्ट्रीय कर्तव्याबरोबर पाण्याची बचतही होणार आहे. साधारण दर तीन वर्षांनंतर बुलडाण्यावर पाणी टंचाईची आपत्ती ओढवते. यावेळी पाणी बचतीबाबत चर्चा होते. विविध उपाय सुचविले जातात; मात्र पाऊस सुरू झाला की, सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे. बुलडाणा वाढतंय, लोकसंख्या वाढतीय; मात्र बुलडाण्यासाठी असलेली पाणीसाठवण क्षमता मात्र वाढणार नाही. सध्या उपलब्ध पाणीच आपल्याला पुरवून वापरावे लागणार आहे, त्यामुळे आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. नगरपालिकेकडून उपाययोजना होतील म्हणून गप्प बसून चालणार नाही. वैयक्तिक पातळीवरही आपण पाणीबचतीसाठी काळजी घ्यायला हवी.
** बुलडाणेकरांनोलक्षात ठेवा..
खरे तर आपण पाण्याशी नीट वागत नाही. अर्मयाद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या बेबंद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे. त्यात पावसाने ओढ दिल्याने बुलडाणेकरांवर आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे. बुलडाणेकरांना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो. आंघोळ बादलीत पाणी घेऊन केल्यास : १८ लिटर शॉवरखाली : १00 लिटर दाढी नळ सोडून दाढी केल्यास : १0 लिटर मग घेऊन : १ लिटर ब्रश नळ सोडून केल्यास :१0 लिटर मग घेऊन : १ लिटर कपडे नळाखाली :११६ लि. बादलीचा वापर केल्यास : ३६ लिटर मोटार पाईप वापरल्यास : १00 लि. बादलीचा वापर केल्यास : १८ लिटर हात धुण्यासाठी नळाखाली : १0 लिटर मग घेऊन : अर्धा लिटर शौचविधी फ्लश केल्यास : २0 लिटर बादलीचा वापर केल्यास : ६ लिटर
** सामूहिक जबाबदारी
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळांची तातडीने दुरुस्ती करा येत्या पावसाळ्य़ात छतावर पडणार्या पाण्याचे संकलन करून त्याचे पुनर्भरण करण्यासाठी पुढाकार घ्या जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. नैसर्गिक जलस्रोत व टेकड्यांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून बुलडाण्याची पुन्हा ह्यग्रीन बुलडाणाह्ण ही ओळख निर्माण करावी.
** वैयक्तिक जबाबदारी
नागरिकांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा. आंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे. नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी. उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग करावा. नैसर्गिक साधनसंपत्तीचे आपण विश्वस्त असल्याचे भान ठेवून काही व्यक्ती, संस्था, गृहनिर्माण सोसायटी यांनी यापूर्वीपासूनच पाणी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये छतावरील पाण्याचे संकलन, पुनर्भरण व पुनर्वापरासाठीचे प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या कामातून अनेकांना प्रेरणा मिळेल. 'लोकमत'च्या माध्यमातून त्यांचे कार्य समाजासमोर आणून त्याला बळ देण्याचा आमचा मानस आहे.
** आपल्या उपक्रमाची/प्रयोगाची माहिती 'लोकमत' कार्यालयात पाठवा. पत्ता : लोकमत जिल्हा कार्यालय, डॉ.पर्हाड बिल्डींग, संगम चौक, बुलडाणा ४४३00१, फोन (0७२६२) २४२६२४ (ई-मेल : lokmatbuldana@gmail.com)
- निवासी संपादक