Sanjay Raut: आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातले देव संपले का? संजय राऊतांनी बुलढाण्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 05:29 PM2022-11-26T17:29:49+5:302022-11-26T17:30:13+5:30
आज ४० रेडे गुवाहाटीला गेलेत त्यांचे लक्ष इकडे लागलेय; संजय राऊतांनी बुलढाण्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज बुलढाण्यात सभा सुरु आहे. यामध्ये हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले असून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत, गद्दारीची बिजे जी रोवली गेलीत ती कायमची उखडून फेकण्याची जबाबदारी या मशालींवर, असे म्हटले आहे.
सर्वात जास्त खोके बुलढाण्यात आलेत. आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातले देव संपले का? हा ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र, ज्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविले, आणि हे मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेलेत, अशी टीका राऊतांनी केली.
शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसाठी मी १०० दिवस काय जन्मठेपेसाठी तयार आहे. राज्य कायद्याने नाही, बेकायद्याने चालले आहे. बेकायदेशीर सरकार आपल्या बोडक्यावर बसविलेले आहे, ते जाणार. मी तुरुंगात जाताना हा भगवा माझ्यासोबत होता, अखेरच्या श्वासापर्यंत हा भगवा माझ्यासोबत राहिल असे म्हणालो होतो. आताही तो सोबत आहे. शिवसैनिक विकत घेता येणार नाही, असेही राऊत म्हणाले.
या बुलढाणा जिल्ह्यात आलेले सगळे खोके आणि सरकार यांनी फक्त जिल्ह्याचीच नाही तर महाराष्ट्राची बदनामी केली. महाराष्ट्राला इतिहास आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये, इतर राज्यांना भुगोल आहे. या जिल्ह्यात जिजामाता जन्माला आल्या, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. म्हणून पहिली सभा बुलढाण्यातून सुरु केली आहे, असा इतिहास राऊतांनी सांगितला.
आज ४० रेडे गुवाहाटीला गेलेत त्यांचे लक्ष इकडे लागले आहे. कारण हे नवस करून आणलेले लोक नाहीत, ते चटणी-भाकरी घेऊन आलेले लोक आहेत. शिवसेना आधीपेक्षा जोमाने पुढे जातेय. ही घोडदौड आता थांबता नये. तुम्ही चाळीस फोडले असाल पण विदर्भातले ४० लाख आमच्यासोबत आहेत. वतनदार फोडले असतील, पण हा मावळा आमच्यासोबत आहे, असे राऊत म्हणाले.