मेहकर आगाराचा गलथान कारभार; वेळेत बस सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:36 PM2017-12-05T23:36:14+5:302017-12-05T23:43:07+5:30
एसटी बसेस वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थाची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेवर एसटी बसेस सोडाव्यात अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ४ डिसेंबर रोजी देण्यात आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी दररोज मेहकरला येणे-जाणे करतात; परंतु एसटी बसेस वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थाची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेवर एसटी बसेस सोडाव्यात अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ४ डिसेंबर रोजी देण्यात आला आहे.
सोनाटी सर्कलमधील खेड्यातून दररोज शेकडो मुले व मुली शिक्षणासाठी मेहकरला ये-जा करीत असतात; परंतु मेहकर आगारातून एसटी बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. शाळेच्या वेळेवर एसटी बसेस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर जाता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सायंकाळी वेळेस एसटी बसेस वेळेवर एसटी डेपोत येत नसल्याने मुलींना घरी जाण्यास उशीर होतो, त्यामुळे पालक चिंतेत असतात. त्याच बरोबर इतर गावांना जाणार्या बसेससुद्धा वेळेनुसार धावत नाही. आगार प्रमुखाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आगारात समस्या वाढत आहेत. त्यामुळे शाळेच्या वेळेवर एसटी बसेस सोडाव्यात अन्यथा युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेचे सोनाटी सर्कल प्रमुख धनंजय देशमुख, एस.ए. मोरे, योगेश बोरे, संतोष इंगळे, दीपक जाधव, किरण अवसरमोल, कार्तिक तांगडे, तेजस तांगडे, शिवम कावरे, महेश बोरे, आदित्य गाडे, निखिल लंबे, नरेश लंबे, गोपाल तांगडे, संकेत तांगडे, योगेश कावरे, राहुल बाहेकर, ओम बाहेकर, नीलेश इंगळे यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.